लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : पवई येथे राहणाऱ्या शास्त्रज्ञ महिलेवर दोन पाळीव कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यांत गंभीर जखमी झालेल्या महिलेला नाकाच्या पुनर्रचनेसाठी शस्त्रक्रिया करावी लागली. पवई पोलिसांनी रविवारी कुत्र्याच्या मालकासह त्यांची देखभाल करणारे आणि घरकाम करणाऱ्या महिलेविरोधात निष्काळजीपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. घटना घडली त्यावेळी कुत्र्यांचा मालक परदेशात होता.
जखमी महिला रिचा संचित कौशिक-अरोरा या पवई येथील जलवायू विहार सेक्टर ए येथे राहतात. त्या एका खासगी कंपनी शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. त्या आपल्या नवीन सदनिकेच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी शनिवारी सकाळी एफ-ब्लॉककडे जात होत्या. रिचा इमारतीबाहेर पडताच मोटरगाडीतून दोन कुत्रे बाहेर आले. त्यांच्यासोबत कुत्र्यांची देखभाल करणारा अतुल सावंत आणि घरकाम करणारी स्वाती होती. कुत्र्यांचे मालक दिवेश विर्क कुटुंबासोबत बी-१२०३ सदनिकेतमध्ये राहतात.
तक्रारीनुसार, स्वाती सांभाळत असलेल्या तपकिरी रंगाच्या कुत्र्याने अचानक शास्त्रज्ञ महिलेवर हल्ला केला. त्यांनी त्या श्वानाला दूर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चालक सावंत सांभाळत असलेला दुसरा (काळा) कुत्रा देखील तक्रारदार महिलेवर चाल करून आला. त्यांच्या हल्ल्यांतून बजाव करण्याच्या प्रयत्नात त्या मागे पडल्या. त्याच वेळी, लहान काळ्या कुत्र्याने माझ्या नाकाला आणि उजव्या मांडीला चावा घेतला, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली, असा आरोप रिचा अरोरा यांनी तक्रारीत केला आहे.
त्यानंतर रिचा यांचे सासरे जितेंद्र शर्मा आणि स्थानिक रहिवासी संजय जालान यांनी रविवारी त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले आणि रिचा यांच्या पतीला माहिती दिली. रिचा या रुग्णालयात भरती असून, नाकाच्या पुनर्रचनेसाठी शस्त्रक्रिया करावी लागल्याचे सूत्रांनी सांगितले. तक्रारदार रिचा यांचे पती संचित कौशिक हे भारतीय नौदलातून निवृत्त झाले असून सध्या खासगी वैमानिक म्हणून काम करतात. त्यांनी मुंबई महापालिकेकडेही कुत्र्यांच्या मालकावर आवश्यक कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
रिचा यांनी याप्रकरणी केलेल्या तक्रारीनुसार, पवई पोलिसांनी कुत्र्यांच्या मालक दिवेश विर्क, देखभाल करणारे अतुल सावंत आणि घरकाम करणारी स्वाती यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम २९१ (प्राण्यांशी निगडीत निष्काळजी वर्तन) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच तिघांना नोटीस बजावण्यात येईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी परिसरातील सीसी टीव्हीच्या मदतीने पवई पोलीस अधिक तपास करीत आहेत. महिलेच्या नाकाला व पायाला जखमा असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.