प्राणी पाळण्याच्या पारंपरिक संकल्पना हद्दपार होण्यासाठी १५ वर्षांच्या कालावधीत ‘पेट’ उद्योगाचा झालेला विस्तार कारणीभूत आहे. सध्या गल्ली तेथे पशुवैद्य आणि पशुखाद्य असे चित्र निर्माण झाले आहे.
छान सजवलेल्या दुकानांमध्ये आकर्षक पद्धतीने खाणे, कपडे, स्वेटर्स, शूज, औषधे, खेळणी, पर्फ्यूम्सपासून डायपर्सपर्यंतच्या बहुरंगी-बहुढंगी आणि एकाला दुसरा पर्याय असलेल्या वस्तूंची आरास.. मात्र या चैनी वस्तूंचे भांडार माणसांसाठी नाही तर त्यांनी लाडाने पाळलेल्या घरातील प्राणीसदस्यासाठीचे आहे.. मुंबई-उपनगर आणि राज्यातील शहरी भागांत आता फक्त पाळीव प्राण्यांसाठी सगळा जामानिमा असलेली डिपार्टमेंटल स्टोअर्स उभी राहिली आहेत. एवढेच नाही, तर त्यातील उत्पादनांच्या वाढत्या मागणीने ती लोकप्रियही ठरली आहेत. पाळीव प्राण्यांचे खाणे, उत्पादने आणि सेवा पुरवणाऱ्या बाजारपेठेची भारतातील उलाढाल ही २०२० पर्यंत साधारण एक हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज आहे. दरवर्षी त्यात २० टक्क्य़ांची वाढ अपेक्षित असल्याचे बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या विविध संस्थांनी आपल्या अहवालांत नमूद केले आहे.
पेट फूडचा बाजार..
आपल्याकडे तयार पशुखाद्य म्हणजे डॉग फूड, कॅट फूडच्या माध्यमातून या बाजारपेठेची रुजुवात झाली. जगाच्या तुलनेने भारतात तयार पशुखाद्याने उशिराच प्रवेश केला. इंग्लंडमध्ये १८६० साली पहिल्यांदा डॉग फूड तयार केले गेले. ९० च्या दशकांत भारतात पेट फूड मिळायला लागले. सुरुवातीच्या काळात पशुखाद्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पशुवैद्यांकरवी (व्हेटर्नरी डॉक्टर) या खाद्य उत्पादनांची विक्री सुरू केली. त्यासाठी दलाली देण्याचा पायंडाही सुरू केला. २०१४च्या अर्थसंकल्पात पशुखाद्यावरील आयातकर कमी करण्यात आला. यानंतर सर्वात महत्त्वाचा बदल झाला, तो म्हणजे परदेशी ब्रँड्सचे प्राणीखाद्य वाण्याच्या दुकानातही मिळू लागले. सध्या पेट फूडच्या ४० ते ५० ब्रँड्सनी भारतीय बाजारपेठेत पाय घट्ट रोवले आहेत. दुकानांमध्ये मिळत असलेल्या उत्पादनांपैकी ४० टक्के उत्पादने ही आयात करण्यात येतात. पाळीव प्राण्यांच्या उत्पादनांच्या बाजारपेठेत अजूनही परदेशी उत्पादनांचाच वरचष्मा दिसत असला तरी अनेक भारतीय कंपन्याही गुणवत्ता दाखवत स्पर्धा करीत आहेत.
ऑनलाइन झेप
तयार पशुखाद्य वापरण्याची सवय आपल्याकडे रुळली आणि त्यानंतर खाद्य आणि पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांची दुकाने गल्लोगल्ली उभी राहिली. आता हा प्रवास साहजिकच ऑनलाइन बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे. फक्त पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांची विक्री करणारी संकेतस्थळे आहेत. यातील एका संकेतस्थळासाठी देशातील एका जुन्या आणि मोठय़ा उद्योगसमूहाने गुंतवणूकही केली आहे. स्थिरावलेल्या संकेतस्थळांवरही देशी-परदेशी उत्पादनांची विक्री सुरू आहे.
बाजारपेठेचा पसारा..
भारतात प्राणीखाद्याची उलाढाल २०२० पर्यंत साधारण ३०० कोटी रुपयांच्या घरात जाईल असा होरा आहे. तर पाळीव प्राण्यांची काळजी घेणे, स्पा आणि ब्युटी पार्लर्स, पाळणाघरे, हॉटेल्स, ब्रििडग, ट्रेनिंग आदी सेवा देणाऱ्या बाजाराची उलाढाल पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा टप्पा सहज गाठू शकेल. प्राण्यांसाठी कपडे, शूज, रेनकोट, स्वेटर्स, पट्टे तयार करणारी फॅशन इंडस्ट्रीही वेगात कार्यरत आहे. या बाजारपेठेत वैद्यकीय सुविधेचाही वाटा मोठा आहे. याशिवाय बिछाने, घरे, पिंजरे, खेळणी, पर्फ्यूम्स, शाम्पू यासारखी उत्पादने घराघरांत स्थिरावली आहेत. एकूण काय तर, आपल्या पेट्सचे लाड करण्याला सीमा राहिलेली नाही.
मागणी असलेली उत्पादने
- खाद्य (डॉग फूड, कॅट फूड)
- कपडे (टी शर्ट्स, हुडीज, स्वेटर्स, रेनकोट, शूज, पट्टे)
- खेळणी
- केअर प्रॉडक्ट्स (शाम्पू, डिओ, डायपर्स, कान-कोरणे, केस विंचरायचे ब्रश)