प्राणीपालक होताना प्राण्यांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेली नियमावली पाळणेही गरजेचे आहे. ती तोडल्यास तुरुंगवास घडू शकतो. तेव्हा आपला प्राणीपालन ‘छंद’ कायद्याच्या कचाटय़ात सापडू नये याची प्रत्येक प्राणीधारकाने काळजी घेणे आवश्यक आहे. प्रचंड मोठय़ा प्रमाणात तयार झालेल्या ‘पेट’ बाजारपेठेमुळे बदलत्या प्राणीशैलीची ओळख करून देणाऱ्या या सदरात यावर्षी पाळीव प्राण्यांशी संबंधित वेगवेगळय़ा गोष्टींची चर्चा..

इसवी सनपूर्व सात हजार वर्षांपूर्वीपासून दुधाची गरज भागविणाऱ्या प्राण्यांचे तसेच मेंढय़ांचे पालन होत असल्याचे मानले जाते.  प्राणीजन्य उत्पादनापलीकडे जाऊन मानवाची प्राण्यांशी मैत्री झाली ती साधारण इसवीसनपूर्व चार हजार वर्षांपूर्वी. त्या वेळी पहिल्यांदाच कुत्रा आणि मांजर पाळली गेली असे मानले जाते. हजारो वर्षांच्या मानवी स्थित्यंतरात प्राण्यांशी मानवाचे नाते घट्ट बनले आहे. आजच्या बदललेल्या मानवी धकाधकीच्या जीवनशैलीत, कमी होत गेलेल्या सकस संवादात उत्पादनाच्या दूध, मांस लोकर या मूलभूत गरजांपेक्षाही प्राणी ही भावनिक किंवा मानसिक गरज बनली आहे. निव्वळ पाळल्या गेलेल्या जिवापेक्षा ते साथीदाराची भूमिका निभावत आहेत. फॅशन सिम्बॉल, प्रतिष्ठेचे लक्षण किंवा निव्वळ हौस म्हणून प्राणी पाळले जातात. ही हौस पुरवण्यासाठीच गेल्या दहा वर्षांत शहर-निमशहरी पट्टय़ांत प्राण्यांसाठीच्या उत्पादनांची अफाट बाजारपेठ उभी राहिली आहे. मात्र, सरसकट मनात येईल तो प्राणी पाळण्यासाठी परवानगी नाही. प्राण्यांचा हक्क आणि संरक्षणासाठीही नियमावली आहे. तिचा भंग केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास किंवा आर्थिक दंड होऊ शकतो.

सध्या आपल्याकडे नियमावलींच्या अज्ञानातूनच सर्रास पक्षी आणि प्राणी विनापरवाना घरोघरी बाळगलेले दिसतात. पोपट, ससे, खारी, कासव ही त्याची हामखास आढळणारी उदाहरणे.  कोंबडय़ा आणि पांढरी बदकं (डोमेस्टिक गीझ) या अपवादाखेरीज कोणत्याही भारतीय प्रजातीचे पक्षी पाळण्यासाठी आपल्याकडे बंदी आहे. दर इमारतीआड गॅलऱ्यांतील पिंजऱ्यात गर्द हिरवा रंग, लाल चुटूक चोच असलेला पोपट कौतुकाने शीळ घालताना दिसतो. मात्र तो पाळण्यासाठी आपल्याकडे परवानगी नाही, हे अनेकांना माहितीच नसते. स्पर्धा किंवा खेळ यांच्यासाठी मालकासाठी राबणारी कबुतरे (पांढरी किंवा करडी) ही पाळीव आहेत. इमारतींवर ठाण मांडून बसणाऱ्या पारव्यांना मात्र वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण आहे. संरक्षित पक्ष्यांच्या चौथ्या सूचीत त्यांचा समावेश असल्याने ते पाळायला परवानगी नाही.

[jwplayer st1SfH1h]

गाय, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, कुत्री, मांजरे, घोडे, स्थानिक गरजेनुसार काही भागांत उंट, पांढरे ससे, हॅमस्टर्स, कोंबडय़ा, पांढरी बदके, परदेशी पक्षी पाळता येतात.  लव्हबर्ड्स, मकाव, कॉकिटेल यांसारखे परदेशी पक्षी पाळण्यासाठी परवानगी आहे. मात्र, त्यांचा पिंजरा, त्याचा आकार याचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. ते पाळणे बंधनकारक असते. घरातील  अ‍ॅक्व्ॉरिअममधील काही परदेशी मासे ठेवण्यासाठीही मत्स्यपेटीचा आकार, खाणे, पाण्यातील खनिजांचे प्रमाण अशा विविध गोष्टींबाबतही निकष ठरवून देण्यात आले आहेत. सध्या याबाबत गंभीर कारवाई दिसत नसली, तरी यातील यंत्रणा सक्रिय झाल्यास प्राणी पाळण्याची हौस जिकिरीचे ठरू शकते. तेव्हा आधीच नियम लक्षात घेऊन आपला पाळीव सोबती निश्चित करणे उचित ठरेल.

काय टाळाल?

कासव, जंगली ससे, खार, माकड, मोर किंवा इतर कोणतेही जंगली प्राणी पाळायला परवानगी नाही. पाळीव प्राण्यांमध्येही मांसासाठी पाळले जाणारे प्राणी आणि मानव सोबती म्हणून बाळगलेले प्राणी असे वर्गीकरण करण्यात आले आहे. पांढरे ससे, शेळ्या, मेंढय़ा मांस मिळवण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या प्राण्यांना मांस मिळवण्यासाठी मारण्याची परवानगी आहे. मात्र कुत्री, मांजरे, पक्षी हे सोबती म्हणून पाळले जातात. त्यामुळे त्यांना मारणे हा गुन्हा आहे.

काय कराल?

घरी पाळलेल्या कुत्र्यांची नियमानुसार नोंदणी करणेही आवश्यक आहे. प्राण्यांच्या संरक्षणासाठीही नियम, कायदे आहेतच मात्र त्यापेक्षाही सोबत किंवा सहवास म्हणून प्राणी पाळल्यानंतर त्यांचीही काळजी घेणे, त्यांना जीव लावणे ओघाने येतेच. प्रेम, काळजी यांचा अलिखित करार प्राणी आणि माणसात असतो. तो राखला की पाळलेला प्राणीही कुटुंबाचा एक भाग बनून आपले जगणे सुखद बनवतो.

[jwplayer iPlkobSb]

Story img Loader