मुंबई : जुहू येथे उभारण्यात आलेले पाळीव प्राणी उद्यान (पेट पार्क ) आता प्राणी आणि प्राणीप्रेमींसाठी खुले करण्यात आले आहे. जुहू समुद्रकिनारी नोव्होटेल हॉटेलसमोर असलेल्या पालिका उद्यानाची दुरवस्था झाली होती. त्यानंतर उद्यानाच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन पाच महिन्यांत ते पूर्ण करण्यात आले. या जागेवर सुरू करण्यात आलेल्या पाळीव प्राणी उद्यानाचे उद्घाटन प्रख्यात चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

मुंबईत महापालिकेच्या अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे. पालिकेने अनेक उद्यानांची दुरुस्ती आणि सुशोभीकरण केले आहे. असे असले तरीही काही ठिकाणची उद्याने अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. जुहू येथील पाळीव प्राणी उद्यानही दुर्लक्षित होते. या उद्यानाचा विकास करण्यात आला आहे. पूर्वी नागरिक येथे कचरा टाकत होते. तसेच, उद्यानात रात्री गर्दुल्यांचा वावर वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या उद्यानाचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. आता या मैदानाचे सुंदर पाळीव प्राणी उद्यानात रूपांतर करण्यात आले आहे. परिणामी, या परिसरातील पाळीव प्राण्यांना हक्काचे उद्यान मिळाले आहे.

मुंबईसारख्या गजबजीच्या शहरात मोकळी जागा मिळणे ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे. त्यात पाळीव प्राण्यांसाठी सुविधा उपलब्ध करणे अवघड होते. अनेक उद्याने आणि काही मोकळ्या जागेतही प्राण्यांना प्रवेश नाकारला जातो. अन्य ठिकाणीही त्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जाते. मुंबईतील अनेक पदपथांची दुरावस्था झाल्याने नागरिकांनाच त्यावरून प्रवास करणे असुरक्षित ठरू लागले आहे. त्यामुळे प्राण्यांना तिथे फिरायला नेण्याचे अनेकजण प्राणी मालक टाळतात. पाळीव प्राण्यांना मोकळेपणाने फिरता यावे, यासाठी २०२२ मध्ये बोरिवली येथे झोइक पेट पार्क सुरू करण्यात आले. त्याला प्राणीप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. अन्य ठिकाणीही प्राण्यांसाठी विशेष उद्यान उभारण्यात यावे, अशी मागणी सातत्याने प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे. या मागणीनुसार अनेक लोकप्रतिनिधींकडून अशा पद्धतीचे उद्यान उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अंधेरी (पश्चिम) परिसरात गेल्या १० वर्षांत ६० उद्याने विकसित करण्यात आली आहेत. या उद्यानांचा विकास करताना पाळीव प्राणी उद्यानाची गरज प्रकर्षाने जाणवत होती. रहिवासी, तसेच प्राणीप्रेमींच्या मागणीनुसार हे पाळीव प्राणी उद्यान विकसित करण्यात आले आहे, असे आमदार अमित साटम यांनी सांगितले.

Story img Loader