सीबीआय दाव्यावर ठाम; कोठडी वाढविण्यासाठी न्यायालयाला विनंती करणार
स्टार टीव्हीचे माजी मुख्याधिकारी पीटर मुखर्जी याला शीना बोरा हत्याकटाची कल्पना होती, मात्र त्याने ती माहिती दडवली. शीना जिवंत असून ती अमेरिकेत असल्याचे मुलगा राहुल यालाही भासविले, असे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
पीटरच्या हत्याकटातील सहभागाबाबत सीबीआय ठाम असून या प्रकरणी त्याच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. पीटर सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे. त्याच्या कोठडीची मुदत उद्या संपत आहे. ही मुदत आणखी वाढवून देण्याची विनंती सीबीआयमार्फत केली जाणार आहे. शीना हत्या प्रकरणाची कुणकुण पीटरला होती, मात्र त्याने त्याबाबत मौन धारण करणे पसंत केले.
पीटर आणि इंद्राणी यांच्या मालकीची वाहिनी विकली गेल्यानंतर त्यातून आलेल्या पैशाचा मोठा हिस्सा शीनाच्या नावे वळविण्यात आला होता. मात्र या हिश्श्याबाबत शीना आग्रही असण्यासोबतच तिने तीन बेडरुम किचनचा फ्लॅटही मागितला होता, असे तपासात स्पष्ट होत आहे.
या माहितीबाबत पीटरकडून दुवा मिळू शकेल, असा अंदाज या अधिकाऱ्याने वर्तविला आहे. याशिवाय राहुल याच्यासोबत झालेल्या दूरध्वनी संभाषणामुळेच पीटरचा सहभाग अधिक स्पष्ट झाला.
कागदपत्रे सीबीआयकडे सुपूर्द
मुंबई : शीनाशी संबंधित सर्व कागदपत्रे राहुल मुखर्जी याने रविवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. ही कागदपत्रे या तपासातील महत्त्वाचा दुवा असून त्यामुळे पीटरचाही सहभाग स्पष्ट होण्यास मदत होणार असल्याची माहिती सीबीआयमधील एका अधिकाऱ्याने दिली.
इंद्राणी मुखर्जी हिच्यासह तिचा पहिला पती संजीव खन्ना, चालक शामवर राय यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्याच्या दिवशीच सीबीआयने दुसरा पती व पीटर मुखर्जी याला अटक केली. पीटरचा मुलगा राहुल यानेच सादर केलेल्या दूरध्वनी संभाषणाच्या तर्जुम्यावरून पीटरला अटक करणे सीबीआयला सोपे गेले. याआधी मुंबई पोलिसांनीही दोन ते तीन वेळा पीटरची चौकशी केली होती. विद्यमान आयुक्त अहमद जावेद यांनी आपण इंद्राणी व पीटर यांना ओळखत असल्याने तपास सीबीआयकडे द्यावे, असे स्पष्ट केले होते. राहुलला सीबीआयने शनिवारीही बोलाविले होते. रविवारी सकाळी त्याने शीनाशी संबंधित विविध कागदपत्रे सीबीआयकडे सुपूर्द केली. या कागदपत्रांच्या आधारेच शीना इंद्राणीला सतत धमकावत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यामुळेच शीना हत्येमागील खरे कारण बाहेर येऊ शकते, असे सीबीआयला वाटत आहे. याबाबत अधिक काहीही सांगण्यास तपास अधिकारी के. के. सिंग यांनी नकार दिला.