मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने राष्ट्रीय हरित लवादापुढे सुनावणी होऊ शकत नाही, हा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लवादापुढील याचिका मागे घेतली आहे.
सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्यावर नाक घासून माफी मागण्याची वेळ येईल, अशी टिप्पणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब यांनी केली, तर परब यांचा गैरव्यवहार सिद्ध झाल्याने माघारीचा प्रश्नच नसल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका सोमय्या यांनी हरित लवादापुढे दाखल केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याने परब यांचे मित्र आणि रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे लवादापुढे सुनावणी होऊ शकत नसल्याचा मुद्दा कदम यांनी उपस्थित केल्याने सोमय्या यांनी याचिका मागे घेतली. त्याचबरोबर सरकारनेच रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिल्याने याचिकेतील मागणीची पूर्तता झाली असल्याचे हरित लवादाच्या आदेशात नमूद केले आहे.
माझ्या बदनामीसाठीच सोमय्यांनी हे कुभांड रचले. त्यामुळे त्यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.- अनिल परब, आमदार, ठाकरे गट
परब यांनी १०० कोटी काय हजार कोटींचा दावा केला तरीही साई रिसॉर्ट गैरव्यवहारावर कारवाई होणारच. – किरीट सोमय्या, भाजप नेते