मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर ओटीपीद्वारे मतदान यंत्र हॅक केल्याची खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, युट्युबर ध्रुव राठी यांच्याविरोधात उच्च न्यायालयात गुरुवारी याचिका करण्यात आली.
न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर ही याचिका गुरुवारी सुनावणीसाठी आली. मात्र, याचिका चुकून या खंडपीठासमोर सूचीबद्ध झाल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलाने निदर्शनास आणून दिल्यावर खंडपीठाने याचिका योग्य खंडपीठासमोर सूचीबद्ध करण्याचे आदेश महानिबंधक कार्यालयाला दिले.
निवडणूक आयोग तसेच मुंबई पोलिसांनी मतदान यंत्र हॅक करता येऊ शकत नाही, असा निर्वाळा दिला होता. त्यानंतरही, प्रतिवाद्यांनी त्याबाबत खोटी, एकतर्फी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. भांडुपस्थित इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनच्यावतीने ही याचिका करण्यात आली आहे. मतदान यंत्राबाबत अपसमज पसरवण्याचे कारस्थान शोधून काढण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात यावे. तसेच चुकीची माहिती पसरवल्याबद्दल आरोपींविरुद्ध योग्य दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या याचिकाकर्त्यांनी केल्या.
एक्स, गुगल, युट्युब, इंस्टाग्राम आणि फेसबूकसारख्या समाजमाध्यमावर यासंबंधी प्रसिद्ध केलेली माहिती काढून टाकण्याचे आदेश प्रतिवाद्यांना द्यावेत. याबाबतची वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या माध्यमांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.