पुण्यातील सनबर्न या फेस्टिव्हल विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ध्वनीप्रदूषणाचे नियम पाश्चिमात्य सणांनाही लागू करा, फक्त भारतीय सणांवरच बंधने का? अशी मागणी करत अमोल बालवडकर यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने रात्री 8 ते 10 या वेळेत लाऊडस्पीकर आणि फटाके उडवण्यास संमती दिली आहे. असं असूनही आंतरराष्ट्रीय म्युझिक फेस्टच्या नावाखाली ध्वनीप्रदूषणाचे सगळे नियम पायदळी तुडवले जातात. दुपारी तीन वाजल्यापासून मध्यरात्री उशिरापर्यंत डॉल्बी साऊंड आणि डीजे कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात सुरु असतात असाही आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

वेळेची मर्यादा आणि डेसिबलची पातळी सांभाळून सण साजरे करण्याची मर्यादा फक्त भारतीय सण उत्सवांना का? सनबर्नलाही कायदा सारखाच आहे असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अनुराग जैन यांनी कोर्टात केला. सुट्टीकालीन न्यायालयात न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. शांतता क्षेत्र नसलं तरीही ध्वनी मर्यादा आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं मत हायकोर्टानं मांडलं आहे. तसंच कार्यक्रमाचं आयोजन होत असलेल्या ठिकाणापासून लोकवस्ती किती दूर आहे? असा सवाल करत या याचिकेवरची सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली आहे.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत पुण्यातल्या बावधन लवळे मध्ये असलेल्या ऑक्सफोर्ड गोल्फ क्लबवर यंदाचा सनबर्न फेस्टिव्हल रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या ऐन तोंडावरच विरोधातली याचिका दाखल झाली आहे.

Story img Loader