याचिकाकर्त्यांचा प्रश्न
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. असे असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन राज्य सरकार उपोषण करणाऱ्या विविध आंदोलकांना देत आहे. हे आश्वासन सरकार कशाच्या आधारे देत आहे? असा प्रश्न करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> यंदाचा तुमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर का होणार नाही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
मराठा समाजाला आरक्षण कसे दिले जाणार? हे राज्य सरकारने उच्च न्यायालयात स्पष्ट करावे, अशी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मनुष्य विकास संस्थेची (सारथी) ७ एप्रिल २०१८ मध्ये स्थापना करण्यात आली. मराठा तरुणांच्या विकासासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. तसेच, सारथीसाठी राज्य सरकारकडून विशेष बाब म्हणून ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुळात सारथी संस्था ही केवळ मराठा समाजासाठी मर्यादित न ठेवता त्याचा लाभ सर्व समाजांतील तरुणांना द्यावा, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.