ठाणे तसेच नवी मुंबई शहरातील इंधनावरील स्थानिक संस्था कर दिड टक्क्य़ांनी कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांतील पेट्रोल सुमारे पावणे दोन रुपयांनी तर डिझेल सव्वा रुपयांनी स्वस्त होणार आहे.
या निर्णयाची उद्या, शनिवारपासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नव्या दरसूचीनुसार, ठाणे शहरात लीटरमागे पेट्रोलचा दर सुमारे ७६ रूपये तर डिझेलचा दर ५८ रुपये, असा असणार आहे. नवी मुंबईतही अनुक्रमे ७६ आणि ६० रुपये इतका होण्याची शक्यता आहे.
ठाणे शहरात इंधनावर साडे चार टक्के जकात कर होता, त्यामुळे ठाणेकरांना मुंबई तसेच नवी मुंबईच्या तुलनेत पेट्रोल, डिझेल या इंधनासाठी जादा पैसे मोजावे लागत होते. गेल्यावर्षी इंधनावरील जकात दर कमी करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे महापालिकेने पाठविला होता. त्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर सर्वसाधारण सभेत जकात दर कमी करून तो ०.५ इतका करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईच्या तुलनेत ठाणे शहरात इंधनाचे दर कमी झाले होते. मात्र, यंदाच्या एप्रिल महिन्यापासून ठाणे महापालिकेने जकात कर बंद करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू केला. त्यामध्ये इंधनावरील स्थानिक संस्था कर साडे तीन टक्के इतका आहे. त्यामुळे ठाणे शहरातील पेट्रोल व डिझेल, आदी इंधनाचे दर पुन्हा वाढले. अशीच अवस्था नवी मुंबईतही आहे.
दरम्यान, ठाणे आणि नवी मुंबई या महापालिकेच्या आयुक्तांनी इंधनावरील स्थानिक संस्था कर कमी करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होते. त्यानुसार, या दोन्ही शहरातील इंधनावरील स्थानिक संस्था कर साडेतीन टक्क्य़ांऐवजी दोन टक्के करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सध्याचे इंधनाचे दर
               ठाणे शहर      नवी मुंबई
पेट्रोल –      ७८.०६          ७७.७७
डिझेल –     ५९.९०           ६२.५०

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा