वाढत्या इंधनदरावरुन एकीकडे सर्वसामान्य चिंताग्रस्त असताना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २५ पेसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर २६ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
यासोबतच पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९६ रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी हा दर ९५ रुपये ४६ पैसे, तर मंगळवारी ९५ रुपये ७५ पैसे इतका होता. तर डिझेलचा दर ९० च्या जवळ पोहोचला आहे. डिझेलचा दर सध्या प्रतिलीटर ८६ रुपये ९८ पैशांवर पोहोचला आहे. सोमवारी हा दर ८६ रुपये ३४ पैसे इतका होता.
दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत २५ पैशांनी वाढले आहेत. यामुळे सध्या पेट्रोलसाठी प्रतिलीटर ८९ रुपये ५४ पैसे आणि डिझेलसाठी ७९ रुपये ९५ पैसे मोजावे लागत आहेत. फक्त १० दिवसांमध्ये इंधनाचे दर तीन रुपयांनी वाढले आहेत.
Petrol and diesel prices increase by 25 paise each in Delhi to stand at Rs 89.54/litre and Rs 79.95/litre respectively.
— ANI (@ANI) February 17, 2021
२०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आतापर्यंत २० वेळ वाढवण्यात आल्या आहेत. पेट्रोलच्या दरात एकूण ५ रुपये ५८ पैसे तर डिझेलच्या किंमतीत ५ रुपये ८३ पैसे इतकी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये प्रीमियम पेट्रोलने शंभरी पार केली आहे. दुसरीकडे मेघालयने पेट्रोल आणि डिझेलच्या रिटेल किंमती पाच रुपयांनी कमी केल्या आहेत.