अधिभार काढल्याने एक ते दीड रुपयांनी दर घटणार
महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवर आकारण्यात येणारा जादा अधिभार काढण्यात येणार असून त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात एक ते दीड रुपयांनी घट होणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी दिली. केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्याशी झालेल्या चर्चेत हा निर्णय झाल्याचे बापट यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेकडून जकात आकारणी होत असल्याने गेली अनेक वर्षे पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांकडून जादा अधिभार आकारत होत्या. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस महाग होता. ही बाब लक्षात आल्यावर पेट्रोलियम कंपन्या व डीलर्स असोसिएशनशी चर्चा करून हे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रधान यांच्याकडे गुरुवारी झालेल्या बैठकीत हा जादा अधिभार वसूल केला जाणार नाही, असे पेट्रोलियम कंपन्यांनी मान्य केले. त्याची अंमलबजावणी महिनाभरात होईल व पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस, केरोसिन यांचे दर कमी होतील, असे बापट यांनी सांगितले.