पेट्रोल-डिझेलच्या दरासह स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीचा भडका उडाला आहे. लॉकडाउन आणि करोनामुळे आर्थिक झळ बसलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे बोझा पडला आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून युवा सेनेने यही है अच्छे दिन? असा सवाल करत मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी सुरू केली आहे.

देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलचे दर अनेक ठिकाणी शंभरीपार गेले आहेत. तर डिझेलचे दरही ९० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक जेरीस आल्याचं चित्र असून, त्यात आता स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीने भर घातली आहे.

आणखी वाचा- “राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा”

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून विरोधक सरकारवर टीका करताना दिसत आहे. शिवसेनेची युथ विंग असलेल्या युवा सेनेने पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरांवरून मुंबईतील वांद्रे परिसरात ठिकठिकाणी पोस्टर लावत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

वांद्रे परिसरातील रस्त्यांच्या बाजूला आणि पेट्रोल पंपावर युवा सेनेनं छोट्या होर्डिंग्ज लावल्या आहेत. यात होर्डिंग्जवर २०१५ आणि २०२१ मधील पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरातील तफावत दाखवून देत युवा सेनेनं हेच आहेत अच्छे दिन? असा उपरोधिक सवाल केला आहे. २०१५ मध्ये स्वयंपाकाच्या गॅसचा सिलेंडर ५७२ रुपयांना मिळत होता. त्याची किंमत वाढून हा सिलेंडर आता ७१९ रुपयांपर्यंत वाढल्याचं पोस्टरवर म्हटलं आहे. त्याबरोबरच २०१५मध्ये प्रती लिटर ५२ रुपयांना मिळणाऱ्या डिझलचे दर २०२१मध्ये ८८.०६ रुपयांवर पोहोचले आहेत. तर ६४.६० रुपये प्रती लिटर मिळणाऱ्या पेट्रोलचे दरही आता ९६.६२ रुपयांवर गेल्याचं युवा सेनेनं पोस्टरमधून म्हटलं आहे.

Story img Loader