पेट्रोल वितरकांचे कमिशन आणि अपूर्व चंद्र समितीच्या अहवालाची त्वरित अंमलबजावणी या मागण्यांसाठी मुंबई महानगरातील सर्व पेट्रोल पंपचालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार उद्या, सोमवारपासून मुंबईतील सर्व पेट्रोल पंप सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांची पुरती गैरसोय होण्याची शक्यता आहे.
सोमवार, १५ ऑक्टोबरपासून शहरातील सर्व पंप एकाच पाळीमध्ये चालविण्यात येणार आहेत, असे इंडियन पेट्रोलियमच्या वितरकांच्या फेडरेशनचे सरचिटणीस रवी शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे पेट्रोल पंपांवरील मनुष्यबळ आणि विजेचा खर्च कमी करणे वितरकांना शक्य होणार आहे. एकाच पाळीत पंप चालवून आम्ही आमचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. इंधनाच्या वाढत्या किमती, पंपावरील अत्याधुनिक यंत्रणा बसविणे यामुळे विक्रेत्यांना कमी लाभ मिळतो आहे, असे ते म्हणाले.
पेट्रोल पंप वितरकांच्या विविध आर्थिक मागण्यांवर विचार करण्यासाठी सप्टेंबर २०१० मध्ये अपूर्व चंद्र समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल पेट्रोलियम मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचे सांगून शिंदे यांनी देशातील सर्व पेट्रोल पंप वितरकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा