केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर करकपात करुन नागरिकांना दिलासा दिला असला तरी दुसऱ्या बाजूला पेट्रोलची दरवाढ कायम आहे. आज पेट्रोलच्या दरात १८ पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलचे दर ७० पैशांनी घटले आहेत. मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८७.१५ पैसे आहे तर प्रतिलिटर डिझेलचा दर ७६.७५ पैसे आहे.  केंद्र आणि राज्याने पेट्रोलच्या करात प्रत्येकी अडीच रुपयांनी कपात केल्याने पेट्रोलचा दर महाराष्ट्रात पाच रुपयांनी घटला होता.

दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्हींच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८१.६८ पैसे आणि प्रति लिटर डिझेलचा दर ७३.२४ पैसे आहे. दिल्लीत डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने डिझेलवर करकपात केल्यामुळे डिझेल थोडे स्वस्त झाले आहे. भारत सरकारने डिझेलच्या दरात एका लिटरमागे २.५० रुपयांची कपात केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही यामध्ये १ रुपयांची कपात करण्याचे ठरवले. तसेच ५६ पैसे कर कपातीचाही निर्णय घेतला. त्यामुळे डिझेल १.५६ रुपये प्रति लिटर स्वस्त करण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारने २.५० रुपये आणि राज्य सरकारने १.५६ रुपये प्रति लिटरने डिझेलचा दर कमी केल्याने आता राज्यात डिझेल एकूण ४.०६ रुपये प्रति लिटर स्वस्त झाले आहे.

 

पेट्रोलियम उत्पादनांचा अजून जीएसटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्हॅट आणि अन्य स्थानिक करांनुसार प्रत्येक राज्यात पेट्रोलचे दर बदलत जातात. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात रोजच्या रोज कच्चा तेलाचे दर वाढत असल्यामुळे इंधनाच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.