२०४७ पर्यंत भारताला इस्लामी राज्य बनविण्याचा व त्या दृष्टीने अधिकाधिक मुस्लिम तरुणांना आपल्याकडे खेचण्याचा पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडियाचा डाव होता. या अनुषंगाने एक डिजिटल पुस्तिकाच हाती लागल्याचा दावा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मुंबई: महिलांच्या आरोग्यासाठी राज्य सरकार राबविणार विशेष मोहीम

राज्यातील दहशतवादविरोधी पथकाने पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडियाच्या पाच सदस्यांना पनवेल, भिवंडी, मालाड, कांदिवली आणि कुर्ला या परिसरातून अटक केली होती. त्यांच्याविरोधात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या पाचजणांविरुद्ध ९० दिवसांत आरोपपत्र सादर करता न आल्याने दहशतवादविरोधी पथकाने न्यायलयाकडून मुदत वाढवून मागितली होती. या पाचही जणांकडून जवळपास ६२७ जीबी इलेक्ट्रॅानिक पुरावा गोळा करण्यात आला होता. त्याची शहानिशा करण्यासाठी वेळ लागत असल्याचा दावा विशेष न्यायालयात करण्यात आला होता. ‘३६५ डेज् : थ्रू अ थाऊजंड कट्स’ अशी एक डिजिटल पुस्तिकाही हस्तगत करण्यात आली आहे. सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ॲाफ इंडिया या पुस्तिकेचे प्रकाशक असल्याचे नमूद आहे. मात्र डेमॉक्रेटिक पार्टी ॲाफ इंडियाने मात्र त्याचा इन्कार केला आहे. या पुस्तिकेत इस्लाम कसा धोक्यात आहे याबाबत ऊहापोह असून अधिकाधिक मुस्लिम तरुणांना आपल्याकडे ओढून हा देश इस्लामिक स्टेट करण्याची योजना मांडण्यात आली आहे, असे आरोपपत्रात नमूद आहे.
महाराष्ट्रासह काही राज्यात जोरदार दहशतवादी कारवाया करण्याची योजना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने आखली होती.

हेही वाचा >>>मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा! गोदरेज कंपनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मात्र ती कागदावर नव्हे तर संगणकात कोडवर्डद्वारे बंदिस्त होती, असा दावाही या तपासाशी संबधित सूत्रांनी केला. याबाबत अधिक माहिती सांगण्यास या सूत्रांनी नकार दिला असला तरी गेल्या सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या कारवाईसत्रात अनेक धक्कादायक बाबी समोर असल्याचा दावाही त्याने केला. प्रमुख म्होरके गजाआड झाले असले तरी या योजनेला खीळ बसली का, याचाही अंदाज घेतला जात असल्याचे या सूत्रांनी सांगितले. सिमीचे प्रमुख म्होरके जेरबंद झाले तर संपूर्ण योजना बारगळत होती. मात्र तो अनुभव गाठीशी असताना आता सिमीचेच प्रतिरूप असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया त्याच पद्धतीने जाईल, असे या सूत्रांना वाटत नाही. त्यामुळे या संघटनेच्या प्रत्येक हालचालीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही या सूत्रांनी सांगितले.
केरळ, तामिळनाडू, कर्नाटक यापाठोपाठ जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवादी कट घडविण्याचा त्यांचा डाव होता.

याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने एक अहवाल तयार केला आहे. आतापर्यंत शेकडो ठिकाणी या यंत्रणेेने छापे टाकले आहेत. पहिल्या व दुसऱ्या फळीतील अनेकजण जेरबंद झाल्याचा आमचा दावा असला तरी याबाबत आम्ही साशंक आहेत. या संघटनेची कार्यपद्धती अद्यापही उघड होत नसल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>मुंबई: नोकरदार महिलांसाठी मुंबईत सात ठिकाणी वसतिगृहे

सिमीमध्येही अनेक होतकरू व उच्चशिक्षित तरुणांचा भरणा होता. पोलिसांनी अटक केल्यानंतरही कुठलीही माहिती द्यायची नाही आणि ते कसे निर्दोष आहेत हे कुटुंबीयांमार्फत प्रसारमाध्यमात सांगत राहण्याची त्यांची गुन्ह्याची पद्धत होती. पॉप्युलर फ्रंटचे सदस्यही त्याच पठडीतील असल्याचे या सूत्रांनी सांगितले. या संघटनेच्या म्होरक्यांनी शाळा-महाविद्यालयातही शिरकाव केला आहे. शिक्षक वा कर्मचारी बनून ते वावरत आहेत. केरळातून तर एका पत्रकाराला अटक करण्यात आली. हा पत्रकार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे उघडपणे काम करीत होता. अशाच पद्धतीने एका फळविक्रेत्यालाही राष्ट्रीय तपास यंत्रणेने केरळमधून अटक केली. त्यामुळे या संघटनेचे सदस्य कोणत्या रूपाने वावरत आहेत. याचा अंदाज घेत असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pfi plan to islamize the entire country by 2047 mumbai print news amy