‘एमसीआय’चा आरोग्य विज्ञान विद्यापीठाला दणका
‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (एमसीआय) नियमांचे पालन न केल्यास मान्यताच रद्द करू, असा इशारा दिल्यामुळे ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’, नाशिकच्या अखत्यारीत होणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम एम.डी. व एम.एस.च्या तसेच एमएस्सीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याची वेळ विद्यापीठावर आली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर यांनी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात ‘नीट’ गोंधळ उडण्याची भीती आता वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
एमडी व एमएस पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी १८३१ विद्यार्थ्यांची परीक्षा २३ मेपासून राज्यातील वीस परीक्षा केंद्रांवर होणार होती; परंतु निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेने उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्दय़ाची तसेच तक्रारीची गंभीर दखल घेत ‘एमसीआय’ने पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला. यामुळे या परीक्षा २५ जुलैपासून घेण्याची वेळ आरोग्य विज्ञान विद्यापीठावर आली. एमसीआयच्या नियमांनुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मुदत ही ३६ महिन्यांची असून काही वेळा विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा होत असल्यामुळे ३६ महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच राज्यात या परीक्षा घेतल्या जात होत्या. या परीक्षा झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांला त्याचा उर्वरित कालावधी वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण करता येत होता. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी २० जूनला परीक्षा घेऊन हा अभ्यासक्रम एक ऑगस्टपासून सुरू करणे बंधनकारक आहे. पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले तर त्याचा परिणाम हा सुपरस्पेशालिटी (अतिविशेष सेवा) अभ्यासक्रमावर होऊ शकतो. यासाठी उशिरा प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांना ३६ महिन्यांचा अभ्यासक्रमाचा कालावधी पूर्ण झाला नाही तरी पदव्युत्तर परीक्षेला बसू देण्यात येत असे. गेल्या वर्षी लातूर वैद्यकीय महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा झाल्यामुळे त्यांचे ३६ महिने पूर्ण होऊ शकत नव्हते. अशा वेळी काही विद्यार्थ्यांसाठी सर्व म्हणजे १८३१ विद्यार्थ्यांची परीक्षा उशिरा घेणे अन्याय करणारे असल्यामुळेच मुदतीपूर्वी परीक्षा घेतल्या गेल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगरे यांनी सांगितले. नेमकी हीच बाब हेरून ‘मार्ड’ने एमसीआयकडे तक्रार केली. सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमाच्या सत्राची सुरुवात १ ऑगस्टपासून सुरू होणे आवश्यक असल्यामुळे २० जून रोजी त्यासाठी प्रवेश परीक्षा घेणे आवश्यक ठरते हे लक्षात घेतल्यास पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षेचे निकाल लवकर लावणे एवढाच एक पर्याय शिल्लक राहतो अन्यथा सुपरस्पेशालिटीच्या ८० जागांसाठी ‘निट’ गोंधळ होऊन न्यायालयीन लढाई लढावी लागेल, असे आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा