पीएच.डी. प्रवेश परीक्षेचे (पेट) गेले काही वर्षे बिघडलेले गणित सावरण्यात अखेर मुंबई विद्यापीठाला यंदा यश आले आहे. अर्थात नियमानुसार ही परीक्षा दोन महिने आधीच म्हणजे ऑगस्ट महिन्यात व्हायला हवी होती. त्याऐवजी ती नोव्हेंबरमध्ये होत आहे.
‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या (यूजीसी) नियमांनुसार वर्षांतून दोन वेळा पेट परीक्षा घेणे विद्यापीठांवर बंधनकारक आहे; परंतु गेली अनेक वर्षे मुंबई विद्यापीठाला हे बंधन पाळता आलेले नाही. एप्रिल-मे महिन्याच्या सुमारास तीही रडतखडत पद्धतीने पेट घेतली जाते. या वर्षीही एप्रिल, २०१४ मध्ये विद्यापीठाने ही परीक्षा घेतील होती.आता १३ ऑक्टोबरला काढलेल्या सूचनेनुसार ८ नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे; परंतु ‘पेट परीक्षेसंदर्भात कुलगुरूंनी काढलेल्या निर्देशांनुसार मार्च आणि ऑगस्टमध्ये ही परीक्षा व्हायला हवी. मार्च, २०१४ ची परीक्षा एप्रिलमध्ये झाली, तर ऑगस्टमध्ये अपेक्षित असलेली परीक्षा नोव्हेंबरमध्ये होत आहे,’ याकडे ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे (मनविसे) कार्यकर्ते संतोष भिंगार्डे यांनी लक्ष वेधले.  पेट परीक्षेबाबतच्या या गोंधळाविषयी अधिसभा बैठकीत प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून विद्यापीठाने चलाखी करीत आठवडाभर आधीच पेट परीक्षेची सूचना काढली, याकडेही भिंगार्डे यांनी लक्ष वेधले. या परीक्षेकरिता २८ ऑक्टोबपर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

Story img Loader