मुंबई : औषध विक्रेता (फार्मासिस्ट) होण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची पदविका किंवा पदवी शिक्षण घेणे गरजेचे असते. अनेक विद्यार्थी पदविकेपर्यंत शिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्य व्यवसाय परिषदेकडे नोंदणी करून नोंदणीकृत औषध विक्रेता होता येत असे. मात्र आता औषधनिर्माणशास्त्रामध्ये पदविका घेणाऱ्यांना परिषदेकडे नोंदणी करण्यासाठी एक्झिट परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या परीक्षेमुळे परराज्यात शिक्षण घेऊन किंवा बोगस प्रमाणपत्र मिळवून औषध विक्री करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औषध विक्रेता होण्यासाठी आवश्यक असलेले पदविका किंवा पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य व्यवसाय परिषदेकडे नोंदणी करून नोंदणीकृत औषध विक्रेता होता येते. मात्र बनावट प्रमाणपत्र तयार करून परिषदेकडे नोंदणी करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस औषध विक्रेत्यांची साखळी तयार झाली होती. मात्र भारतीय औषध परिषदेने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार यापुढे ‘डिप्लोमा इन फार्मसी’ हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणीकृत औषध विक्रेता होण्यासाठी एक्झिट ही परीक्षा देणे बंधनकारक असेल.

हेही वाचा : मुंबई : चुनाभट्टी येथे पूर्ववैमनस्यातून गोळीबार, एकाचा मृत्यू

ज्या उमेदवारांनी २०२२ – २०२३ या शैक्षणिक वर्षांत डी. फार्मला प्रवेश घेतले आणि २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षांत उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांना एक्झिट परीक्षेत उत्तीर्ण होईपर्यंत नोंदणीकृत औषध विक्रेता होता येणार नसल्याचे नमूद केले आहे. डी. फार्म झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै ते सप्टेंबर २०२४ दरम्यान प्रथम एक्झिट परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही भारतीय औषध व्यवसाय परिषदेच्या आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा : ठाण्यातही विशेष मुलांसाठी उपचार केंद्र सुरू होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

“औषध क्षेत्रातील ज्ञान नसताना, इंग्रजीमध्ये स्वाक्षरी न करता येणारे अनेकजण घरबसल्या अन्य राज्यातून गैरमार्गाने डी. पदविका घेऊन महाराष्ट्र राज्य व्यवसाय परिषदेत फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करत होते. अशा गैरप्रकारांना आता आळा बसेल. भारतीय औषध व्यवसाय परिषदेने हा निर्णय उशीरा का होईना घेतला. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत आहे.” – कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस असोसिएशन

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pharmacy degree holders have to give exit examination to start business mumbai print news css
Show comments