राज्याच्या विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनात फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच चर्चेत आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी सभागृहात बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले होते. तसेच चौकशीची मागणी केली होती. त्यावर फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केले होते. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष राज्याचे पोलीस महासंचालक असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या समितीचे अध्यक्ष राज्याचे पोलीस महासंचालक असतील तर राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे आयुक्त आणि मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा) हे दोन समितीचे सदस्य असणार आहेत. ही समिती या प्रकरणाची चौकशी करेल आणि ३ महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले

“मी खासदार होतो. माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं कारण काही नव्हतं. पण मला मिळालेल्या माहितीनुसार माझं नाव ठेवण्यात आलं होतं अमजद खान. केंद्रातले सध्याचे मंत्री दानवे यांच्या पीएचा नंबर देखील टॅप केला गेला. खासदार संजय काकडेंचा नंबर टॅप केला गेला. अशी खूप नावं आहेत. त्यांच्याच लोकांचे देखील फोन टॅप केले गेले. कुणाचीही गोपनीयता भंग करण्याचा अधिकार कुणालाही नाही. धर्मातही हेच म्हटलं आहे की कुणाच्या गोष्टी आपण ऐकल्या तर ते पाप असतं. आता सुसंस्कृत लोकं असं राजकारण करत असतील तर माहिती नाही”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

हेही वाचा- ‘अनिल देशमुख’ करु, ‘भुजबळ’ करु अशा धमक्या म्हणजे गुंड, राडा प्रवृत्ती; जाधवांना धमकावल्यावरुन भाजपावर हल्लाबोल

“माझ्यावर अंमली पदार्थांच्या व्यवसायाचा आरोप”

“हे फोन टॅपिंग करण्याची गरज काय? याच्यामागे कोण आहे? २०१७-१८ च्या काळात पुणे पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून हे फोन टॅप केले गेले. कुणाच्या आदेशाने हे झाले? साखर कारखान्यांबद्दल तक्रारींची मोहीम सुरू आहे. गडकरी साहेबांची देखील तक्रार केली आहे. त्यांचेच लोक आता पत्र देत आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती गृहमंत्र्यांनी आम्हाला द्यावी. आमच्यावर आरोप लावले की ही व्यक्ती कोणतंही काम, व्यवसाय करत नाही. अंमली पदार्थांची तस्करी करत आहे. हे माझ्यावरच नाही, तर जितक्या लोकांचे फोन टॅप झाले, त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला. किती लोकांचे, कुणाचे फोन टॅप केले गेले याची माहिती हवी. याचे सूत्रधार कोण आहेत? याला शासनाची मान्यता घ्यावी लागते”, अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phone tapping case will be investigated state government forms three member committee srk