|| मंगल हनवते

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी ‘म्हाडा’चा निर्णय

मुंबई : तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी म्हाडाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार परीक्षार्थीच्या छायाचित्राची आणि परीक्षा केंद्रातील हालचालींची तपासणी करण्यात येणार आहे.

 या तपासणीत दोषी आढळणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यात निवड झालेला उमेदवार असल्यास त्याची निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे.

  म्हाडाची भरती परीक्षा नुकतीच ऑनलाइन पद्धतीने पार पडली. त्यात गैरप्रकार झाले. परीक्षेच्या काळात राज्यभरात एकूण नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील आठ गुन्हे तोतया उमेदवारांविरोधातील आहेत; तर एक गुन्हा मोबाइल बाळगणाऱ्या परीक्षार्थीविरोधात आहे.

५६५ रिक्त जागांसाठी टीसीएसच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी म्हाडाने ऑनलाइन पद्धतीने टीसीएसच्या मदतीने परीक्षा घेतल्या. तरीही यात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समिती करीत आहे. या गैरप्रकाराची व्याप्ती मोठी असू शकते असे म्हणत एमपीएससीच्या धर्तीवर मुख्य परीक्षा घेण्याची तसेच गैरप्रकाराची विशेष तापणसी पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणीही समितीने केली आहे.

परीक्षेच्या काळात एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड, पवई, सातारात, नागपुरात प्रत्येकी एक, अमरावती ३, नाशिकमध्ये २ अशा ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याची माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. टीसीएस आणि म्हाडाच्या सतर्कतेमुळेच तोतया उमेदवारांना, तर मोबाइल बाळगणाऱ्या उमेदवाराला अटक झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी परीक्षेतील गैरप्रकाराची व्याप्ती मोठी असल्याचे आरोप नाकारले आहेत. मात्र चुकूनही बोगस भरती होऊ नये यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यानुसार परीक्षार्थीचा अर्जातील फोटो, परीक्षा केंद्रामध्ये घेण्यात आलेला फोटो, केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे परीक्षार्थीच्या हालचाली, निवड झाल्यास कागदपत्र पडताडणीसाठी आल्यानंतर घेण्यात येणारा फोटो तसेच अंतिम निवडपत्र घेण्यासाठी आल्यानंतर घेण्यात आलेले छायाचित्र या सर्व बाबींची तपासणी होणार आहे. या तपासणीत कोणत्याही टप्प्यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. तर अंतिम टप्प्यात दोषी आढळणाऱ्याची निवड रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य परीक्षेची मागणी फेटाळली

बोगस भरती रोखण्यासाठी निवड झालेल्यांची मुख्य परीक्षा घ्यावी ही एमपीएससी समन्वय समितीची मागणी म्हाडाने फेटाळली आहे. मुख्य परीक्षा घेण्याऐवजी बोगस भरती टाळण्यासाठी इतर उपाययोजना करण्यात येत असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण परिक्षार्थी मात्र मुख्य परीक्षा घ्यावी या मागणीवर ठाम आहेत. ही मागणी आता उचलून धरण्यात येईल अशी माहिती एमपीएससी समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photographs examinee examination center movements mhada decision stop fake candidates akp