मुंबई: बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये तुमची पचनक्रिया बिघडते. ज्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही आणि मल बाहेर येण्यास अडथळा येतो. बध्दकोष्ठतेच्या या दीर्घकालीन समस्येमुळे गुदाशयावर ताण येतो व त्यातून मूळव्याध आणि फिशर सारख्या समस्या सतावतात. ४५-६५ वयोगटातील अंदाजे २० टक्के लोक या दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे त्रस्त आहेत. या रूग्णांना मूळव्याध आणि गुदद्वारासंबंधीचा फिशर सारख्या गुंतागुंती होण्याची शक्यता अधिक असते.
बऱ्याचदा गंभीर प्रकरणांमध्ये बद्धकोष्ठतेमुळे गुदाशयावर जास्त ताण आल्याने रक्त गोठू शकते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अशा स्थितीत भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी बद्धकोष्ठतेवर वेळीच उपचार करणं गरजेच असल्याचे ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
दीर्घकालीन बद्धकोष्ठता म्हणजे आठवडाभर किंवा त्याहून अधिक काळ पोट साफ न होणे. त्याच्या लक्षणांमध्ये पोट फुगणे, पोटदुखी, आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान ताण येणे आणि अपूर्ण मल बाहेर पडल्याची समस्या सतावणे. जर वेळीच उपचार केले नाहीत तर जास्त दाब आल्याने गुदाशयातील ऊतींचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे मूळव्याध आणि फिशर सारखी समस्या उद्भवते ज्यामुळे वेदना आणि रक्तस्त्राव होतो असे मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता व ज्येष्ठ सर्जन डॉ मोहन जोशी यांनी सांगितले. पिझ्झा-बर्गरसारखे खाणे तसेच खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि पुरेसे पाणी न पिणे यातून हा त्रास उद्भवू शकतो. प्रामुख्याने कामावरील महिलांना अनेकदा स्वच्छतागृहाची योग्य व्यवस्था नसल्यामुळे या महिला कमी पाणी पितात यामुळेही बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. याशिवाय मधुमेह असलेल्या व्यक्तिंना बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त होत असल्याचे पाहायला मिळते. यावर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचो डॉ जोशी म्हणाले.
दीर्घकालीन बद्धकोष्ठतेची कारणे म्हणजे आहारात फायबरची कमतरता, व्यायामाचा अभाव, प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन, काही ठराविक औषधे, इरिटेबल बाऊल सिंड्रोम(आयबीएस) या सारख्या समस्या, गर्भधारणा तसेच वृद्धापकाळातील आतड्याच्या कार्यात येणारे अडथळे. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे गुदाशयातील नसांवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे सुज येते आणि मूळव्याधाची समस्या उद्भवते. सतत ताण आल्याने रुग्णाच्या गुदद्वारात फोड किंवा जखमा होऊ शकतात. हे फोड गुद्दवाराच्या आत आणि बाहेर असे दोन्ही बाजूंना येऊ शकतात. ही स्थिती अधिक गंभीर झाल्यास त्यातून रक्तस्त्राव आणि वेदना देखील होऊ शकतात. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे शौचास रक्तस्राव होणे,आतडी पिळवटल्यासारखे वाटणे तसेच फिशरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या योग्य सवयी व जेवणात पालेभाज्यांचा वा हिरव्या भाज्यांचा जस्त वापर करणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.त्याचबरोबर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करणे गरजेचे असल्याचे मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील जनरल सर्जन डॉ. लकिन वीरा यांनी सांगितले.
साधारणपणे ४५-६५ वयोगटातील अंदाजे २० टक्के लोक पोट साफ होत नसल्याच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात दाखल होतात. साधारणपणे १० पैकी दोन व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास असल्याचे दिसून येते. यात गुदाशयावर ताण पडल्याने त्यांना मूळव्याध आणि फिशरचा धोका उद्भवतो. रुग्णांना बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि फिशर यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल जागरुक करुन त्यांना स्टूल सॉफ्टनरसह आवश्यक उपायांविषयी सल्ला दिला जातो असे ठाण्यातील डॉक्टर पराग देशपांडे यांनी सांगितले.
या आजारांवर उपचारांमध्ये आहारातील फायबरचे सेवन वाढवणे, हायड्रेटेड राहणे आणि आवश्यक असल्यास स्टूल सॉफ्टनरचा वापर करणे गरजेचे आहे. गंभीर प्रकरणांमध्ये, या आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी कमीत कमी आक्रमक प्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. पुरेसे पाणी पिणे, फायबरयुक्त अन्नाचे सेवन करणे आणि दररोज व्यायाम करुन बद्धकोष्ठतेची समस्या दूर करणे गरजेचे आहे. जीवनशैलीत योग्य ते बदल आणि नियमित डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर करता येऊ शकते,असे डॉ पराग देशपांडे म्हणाले.
सध्या आमच्याकडे येणाऱ्या बहुतांश रुग्णांना बद्धकोष्ठतेची समस्या सतावतेय. प्रौढ वयोगटातील सुमारे १५ टक्के लोक दररोज शौचास न होणे, पोट फुगणे आणि पोटदुखी अशा तक्रारी घेऊन येतात. उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांमध्ये किमान दोन लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. आतडे रिकामे करताना सतत येणाऱ्या दबावामुळे त्यांना मूळव्याध आणि फिशर होण्याची शक्यता असते. मूळव्याध आणि फिशरमुळे गुदाशयातील नसांमध्ये दीर्घकाळ ताण येऊन रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. मल विसर्जन करताना सतत ताण दिल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक होऊ शकतो. बद्धकोष्ठतेचे वेळीच व्यवस्थापन केल्यास मूळव्याध आणि फिशरसारख्या गुंतागुंत टाळता येते. जाभुंळ, सफरचंद, चिया सीड्स, गाजर आणि बीटसह फायबरयुक्त आहार, नियमित शारीरिक हालचाली आणि पुरेसे पाणी पिणे हे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत करते. मल विसर्जन करताना जास्त ताण देणे टाळा आणि प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते. वेळेवर उपचार केल्याने दीर्घकालीन समस्या टाळता येते आणि मूळव्याध आणि गुद्दाशयाला भेगा पडणे यासारख्या गुंतागुंतीचा धोका कमी होतो असे झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल म्हणाले.