लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोष नगरलगतच्या फिल्मसिटी मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. वेळेत कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक दाबून संबंधित मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. दररोज हजारो गाड्यांची ये-जा होत असलेल्या या मुख्य रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांकडे महापालिका प्रशासनांचेही दुर्लक्ष झाले आहे. मात्र, समाजमाध्यमावर कचऱ्याच्या ढिगाऱ्याची छायाचित्रे प्रसारित होताच महापालिकेला जाग आली आणि सोमवारी दुपारी काही तासांतच संबंधित परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.

गोरेगाव भागातील फिल्मसिटी मार्गावर कचऱ्याची विल्हेवाटच लावली जात नसल्याने परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. कचरा व्यवस्थापनासाठी या ठिकाणी पुरेशा कचराकुंड्यांचा अभाव असल्यामुळे फिल्मसिटी मार्गावर कचऱ्याचे ढीग साचत आहेत. वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या कचराकुंड्या आदींचा त्रास नागरिक व पादचाऱ्यांना होऊ लागला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता तसेच घुशी आणि भटक्या कुत्र्यांचा वावर वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. मात्र महापालिकेकडून अनेकदा या परिसरातील कचरा उचलला जात नाही, असा आरोप रहिवाशांकडून होत आहे. दरम्यान, मराठी चित्रपट दिग्दर्शक, लेखक समीर विद्वांस यांनीही रस्त्यावरील कचऱ्याबाबत रविवारी ट्वीट करून संताप व्यक्त केला. तसेच परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली.

आणखी वाचा-दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा

दुसरीकडे, फिल्मसिटी मार्गावरील या परिसरात नित्यनेमाने स्वच्छता केली जाते. तसेच या भागात कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय, कचरा गोळा करणाऱ्या गाडीचीही फेरी होते. मात्र या वेळेत अनेक जण कचरा टाकत नाहीत, तसेच काही़च अंतरावर असलेल्या कचराकुंडीत कचरा टाकण्यासाठी चालावे लागत असल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.