मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्षाची महायुती झाली असली तरी पिंपरी – चिंचवडमध्ये भाजप आणि रिपब्लिकन पक्षाची युती जागावाटपावरून तुटली आहे. रिपब्लिकन पक्षाला पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत २८ जागा हव्या होत्या. मात्र, भाजपने केवळ तीनच जागा दिल्या आहेत. ते अमान्य असल्याचे सांगत येथील स्थानिक नेत्यांनी युती तुटल्याचे जाहीर केले आहे. भाजप आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांची युती तुटली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागावाटपावरून ही तुटल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये आम्हाला २८ जागा हव्या होत्या. भाजपने सुरुवातीला आम्हाला १८ जागांचा प्रस्ताव दिला. परंतु नंतर केवळ तीनच जागा दिल्या आहेत. ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे भाजपसोबतची युती तोडत असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक नेते चंद्रकांत सोनकांबळे यांनी सांगितले.

तत्पूर्वी आज दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी भाजप-रिपब्लिकन पक्ष-रासप आणि शिवसंग्राम पक्षांची मुंबई महापालिकेसाठी महायुती झाल्याची घोषणा केली. भाजपने मित्रपक्षांसाठी ३४ जागा सोडल्या आहेत. तर भाजप १९५ जागांवर निवडणुका लढणार आहे. मित्रपक्षांतील रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला २५, राष्ट्रीय समाज पक्षाला पाच आणि शिवसंग्रामला चार जागा सोडण्यात आल्या आहेत. जागावाटपाचा तिढा सुटल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केले. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप नक्कीच क्रमांक एकचा पक्ष असेल. मुंबईचे महापौरपद भाजपचा असेल. भाजप आणि मित्रपक्षांची मुंबई महापालिकेत सत्ता आली तर रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद देणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आमच्या पक्षाला ४०-४५ जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. पण आमच्या पक्षासाठी भाजपने २५ जागा सोडल्या आहेत. ते आम्ही मान्य केले आहे. मुंबईच्या विकासासाठी महायुतीचा महापौर करून तर बघा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, शिवसंग्रामसाठी भाजपने चार जागा सोडल्या आहेत. त्यावर समाधानी आहोत, पण संतुष्ट नाही, अशी प्रतिक्रिया शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केली. राज्यातील महापालिका निवडणुकांतही महायुती कायम राहील, असे बोलले जात असतानाच, जागा वाटपावरून पिंपरी-चिंचवडमध्ये रिपब्लिकन पक्षाने भाजपशी काडीमोड घेतला आहे.

दरम्यान, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी कालपर्यंत ६०३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुमारे १७८५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता महापालिकेच्या १२८ जागांसाठी एकूण २३८८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.