केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर शुक्रवारी पिंपरीमध्ये एका खासगी शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते. पण कार्यक्रमाची कोणतीच तयारी नसल्याने ते संतापाच्या भरात निघून चालले होते. पण त्याचवेळी शाळेच्या प्राचार्य तिथे आल्या व त्यांनी कशीबशी समजूत घालून त्यांना थांबवले.

प्रकाश जावडेकर ठरलेल्या कार्यक्रमानुसार संध्याकाळी साडेपाच वाजता पिंपरीत जय हिंद हायस्कूलच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले. ठीक पावणेसहा वाजता त्यांचा ताफा शाळेत दाखल झाला. त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचे स्वागत करायला कोणीच नव्हते. त्यामुळे ते संतापले व मी जाऊन आलो असे म्हणत उदघाटन न करताच ते ताडकन गाडीच्या दिशेने निघाले.

गाडीचा दरवाजा उघडला तेवढ्यात प्राचार्य तिथे आल्या आणि त्यांनी कशीबशी त्यांची समजून घालून त्यांना आत नेले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटात पालकमंत्री गिरीश बापट,आमदार लक्ष्मण जगतापांसोबत भाजपाच्या नेत्यांचा ताफा आला. त्यानंतर कार्यक्रम सुरु झाला. पाहिले भाषण ट्रस्टी लिनी गेरा यांचे झाले. त्यानंतर गिरीश बापट यांना भाषणासाठी आमंत्रित केले. त्यांनी अवघ्या पाच मिनिटात भाषण उरकत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

सोबत भाजपाचे नगरसेवक, कार्यकर्ते हळू हळू निघून गेले. शेवटी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर एकटेच होते. या कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थितीही फार कमी होती. सर्वच शाळेतील कर्मचारी आणि शिक्षिका उपस्थित होत्या. मला पूर्वनियोजित इफ्तार पार्टीचे खूप कार्यक्रम आहेत. पुण्यात जाण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे जास्त वेळ लागतो. त्यामुळे मी तुमची रजा घेतो असे म्हणत केवळ पाच मिनिटात बापट यांनी भाषण आटोपलं.

Story img Loader