मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी अधिकाधिक नागरी सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र पिंक टॉयलेट्स, हिरकणी कक्ष, सर्व अनुयायांना शुद्ध पेयजल पुरविण्यासाठी रिव्हर्स ऑसमॉसिस (आरओ) प्लांट, अतिरिक्त प्रसाधनगृह आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यासोबतच संपूर्ण परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगानेही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
देशातील कानाकोपऱ्यातून मुंबईत मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या अनुयायांसाठी नागरी सेवा-सुविधांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेशी संबंधित विषयांमध्ये सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमतानाच नियमित स्वच्छतेसाठी अधिकाधिक भर देण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत. रांगेतील अनुयायांसाठी, मुख्य रस्त्यांवर, इंदू मिल परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी अतिरिक्त शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरातील स्वच्छतेच्या व्यवस्थेसाठी प्रत्येक सत्रामध्ये २२० कामगार उपलब्ध करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>शपथविधी सोहळा; अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन मार्गात अडथळा ठरणाऱ्या रस्ता दुभाजकावर हातोडा
त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील स्वच्छतेसाठी प्रत्येक सत्रामध्ये २२५ कामगार तैनात करण्यात आले आहेत. यंदा महिला अनुयायांच्या सुविधेसाठी पिंक टॉयलेटची चार ठिकाणी व्यवस्था, तसेच माता आणि बालकांच्या सुविधेसाठी चार हिरकणी कक्षांचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अनुयायांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याच्या दृष्टीने आरओ प्लांटची सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच पिण्याच्या पाण्याचे ५३० नळ, पाण्याचे ७० टॅंकर, तसेच, येथे स्नानगृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेतील अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची बाटली आणि बिस्किटेही देण्यात येणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य देऊन अतिरिक्त मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. तसेच शौचालयांच्या संख्येतही यंदा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.