मुंबई बॉम्बस्फोटातील एक आरोपी, गॅगस्टर अबू सालेम याला मारण्यासाठी तळोजा येथील कारागृहात पिस्तूल अवघ्या तीनशे रुपयांत गेल्याची धक्कादायक बाब उघडीस आली असून अबू सालेमचा गेम करण्याचा त्यापूर्वी दोन वेळा प्रयत्न झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. मे महिन्यात गेलेले हे पिस्तूल अनाऊन्समेंटसाठी ठेवण्यात आलेल्या लाऊडस्पीकरमध्ये लपविण्यात आले होते. मात्र पिस्तूल गोळीबाराच्याच दिवशी कारागृहात आले हे सिद्ध करण्याचा कारागृह पोलिसांचा अट्टहास आहे.
तळोजा कारागृहात अबू सालेमवर दोन आठवडय़ांपूर्वी गोळीबार करणाऱ्या देवेंद्र जगताप ऊर्फ जेडी याची कहाणी एखाद्या ‘दे मार’ हिंदी चित्रपटाला शोभावी अशी आहे. नवी मुंबई क्राईम ब्रॅन्चच्या ताब्यात असणाऱ्या जेडीने तळोजा कारागृहातील अनेक गोष्टींचा भांडाफोड पोलिसांकडे केला आहे. त्यामुळे यानंतर त्या कारागृहात पाठवू नका अशी विनंतीही त्याने पोलिसांना केली आहे. सालेमला मारण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल हे तीन मे रोजी कारागृहात मुलाखतीच्या दरम्यान दिले गेल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी प्रवेशद्वाराजवळ अभ्यांगतांची नोंद करणाऱ्या हवालदाराला तीनशे रुपये देण्यात आले होते. जेडीला पिस्तूल पोहोचविणाऱ्या मनोज लमाणे याने मिठाईच्या बॉक्समधील ते पिस्तूल पोटाजवळ लपवून त्यावर शर्ट मोकळा सोडला होता. त्यानंतर झालेल्या तपासणीतही ते सुटले कारण तेथेही तीनशे रुपये देण्यात आले होते. सर्व मुलाखतकारांना काही ना काही चिरीमिरी दिल्याशिवाय मुलाखतीला जाता येत नाही. मनोजने ते पिस्तूल नंतर जवळच्याच भिंतीवरून कारागृहात फेकले. त्यानंतर जेडीने ते ताब्यात घेऊन कारागृहातील लाऊडस्पीकरमध्ये लपवून ठेवले. त्यासाठी त्या लाऊडस्पीकरचे नट दररोज ढिले केले जात होते. कारागृहात असणाऱ्या एका खिळ्याला पुढे निमुळते करून त्याचा स्क्रूड्रायव्हरसारखा उपयोग केला जात होता. गोळीबाराच्या दिवशी तर ते जेडीच्या सेलमध्ये असणाऱ्या प्लास्टिक पिशवीत होते. हे पिस्तूल गोळीबाराच्याच दिवशी कारागृहात आले हे सिद्ध करण्यासाठी कारागृह पोलिसांनी जेडीला तीन दिवस बेदम माराहाण केली. मनोज आणि जेडी यांच्या मोबाइलवरील संभाषणाचे पुरावे पोलिसांनी तापसल्यानंतर जेडी कधीही खोटे बोलल्याचे आढळले नाही.
तळोजा कारागृहात सालेमचे चांगलेच वजन असून गोळीबाराच्या दिवशी तो कारागृहात मोबाइल फोनवर बोलत होता. त्याला या गोळीबारापूर्वी दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. सालेम कारागृहात फिरताना त्याच्या चारही बाजूंना त्याचे नंबरकरी असल्याचे जेडीने सांगितले. जेडीच्या दोन पंटरांना फोडण्यातही सालेम यशस्वी झाला आहे. पैशांची चणचण आणि आपल्या पंटरांना फोडण्याचे दु:ख यामुळे सालेमवर गोळीबार करण्याची जोखीम जेडीने उचलली. दहावीला पहिल्या श्रेणीत उर्तीण झालेल्या जेडीचे शिक्षण सायन्समधून तेरावीपर्यंत झाले आहे. बुद्धीने तेज असणाऱ्या जेडीने पहिला खून चेंबूरमधील मल्लेश शेट्टी याचा केला. छोटा राजन, भरत नेपाळी, छोटा शकील, या टोळयांसाठी काम करणारा जेडी आता ना घर का ना घाट का राहिला.
अवघ्या तीनशे रुपयांत पिस्तूल तळोजा कारागृहात
मुंबई बॉम्बस्फोटातील एक आरोपी, गॅगस्टर अबू सालेम याला मारण्यासाठी तळोजा येथील कारागृहात पिस्तूल अवघ्या तीनशे रुपयांत गेल्याची धक्कादायक बाब उघडीस आली असून अबू सालेमचा गेम करण्याचा त्यापूर्वी दोन वेळा प्रयत्न झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. मे महिन्यात गेलेले हे पिस्तूल अनाऊन्समेंटसाठी ठेवण्यात आलेल्या लाऊडस्पीकरमध्ये लपविण्यात आले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-07-2013 at 04:29 IST
TOPICSपिस्तूल
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pistol at cost of rs 300 in taloja jail