मुंबई : डॉकयार्ड रोड येथील बॉडीगार्ड पोलीस वसाहतीत राहाणाऱ्या एका पोलीस शिपायाचे घर फोडून अज्ञात चोरटय़ांनी एक पिस्तूल आणि ३० जिवंत काडतुसे चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भायखळा पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके चोरटय़ांना पकडण्यासाठी आणि त्यांच्याकडून चोरलेला शस्त्रसाठा हस्तगत करण्यासाठी कसून तपास करत आहेत.
राज्य दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असलेले नीलेश मोहिते यांचे पोलीस वसाहतीत तळमजल्यावर घर आहे. शनिवारी ते आजारी वडिलांना भेटण्यासाठी गावी गेले होते. तेथून घरी परतले असता घरातून पिस्तूल, काडतूस यांसह १४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपयांची रोकड घरातून गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मोहिते यांच्या घरी चोरी केल्यानंतर चोरटय़ांनी वसाहतीच्या शेजारी ‘नायक हाऊस’ इमारतीत राहणाऱ्या नसरुद्दीन शेख यांच्या घरी चोरी केली. शेख यांच्या घरातील सुमारे २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरटय़ांनी पळवली. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी घरफोडीचे स्वतंत्र गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. चोरी झालेल्या शस्त्रसाठय़ाचा वापर गंभीर गुन्हय़ांसाठी होऊ शकतो, अशी भीती असल्याने पोलीस चोरटय़ांचा कसून शोध घेत आहेत.