आझाद मैदानातील हिंसाचार
आझाद मैदान येथे गेल्या ११ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचाराबाबत महिला वाहतूक पोलीस निरीक्षकाने केलेल्या कवितेविरोधात केलेली याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकादारांनी या प्रकरणी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
ही कविता जातीय तेढ निर्माण करणारी असून कायदा-सुव्यवस्थेची घडी नीट ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतीलच एकीने लिहिली असून त्यामुळे सामाजिक बांधिलकी धोक्यात आणली जात आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. ‘मुस्लिम-ए-हिंद’ या संस्थेचे अमीन मुस्तफा इद्रिसी यांच्यासह हिंसाचारातील एक आरोपी नजर मोहम्मद अशा दोघांनी ही याचिका केली आहे. मोहम्मद हा सध्या जामिनावर बाहेर आहे. या कवितेप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, सहआयुक्त (प्रशासन) हेमंत नागराळे, ही कविता लिहिणाऱ्या सुजाता पाटील या महिला पोलीस निरीक्षक आणि त्यांची कविता प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकाचे पदाधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळेस ही कविता करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याने माफी मागितल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. न्यायालयानेही या प्रकरणी याचिकादारांनी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची सूचना करताना याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा