पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’चे हल्ली खूप कौतुक होत असले तरीही तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या क्षेत्रात २५ वर्षांपूर्वीच राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने फार मोठी झेप घेतली होती, असे स्पष्ट मत ‘तंत्रज्ञान गुरू’ सॅम पित्रोदा यांनी मंगळवारी मुंबईत व्यक्त केले.
पित्रोदा यांच्या ‘बिग ड्रिम माय जर्नी टू कनेक्ट इंडिया’ या आत्मचरित्राचे प्रकाशन उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या हस्ते नरिमन पॉईट येथील एका हॉटेलमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे पुस्तक पेंग्विन रॅण्डम हाऊस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
गेल्या काही वर्षांत भ्रमणध्वनीचा व्याप अतिशय मोठय़ा प्रमाणात वाढला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’चे लोकांना विशेष महत्त्व वाटू लागले आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राजीव गांधी यांनी भारताला फार पुढे नेले. काँग्रेस सरकारने मागच्या ५० वर्षांच्या काळात भारताच्या प्रगतीसाठी भरीव कामगिरी केली नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. काँग्रेसने काहीच केले नसते तर देशाची एवढी प्रगती झाली नसती, असेही ते म्हणाले. तरुण-तरुणींनी काळाची गती ओळखून त्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्राची निवड करावी आणि आत्मविश्वासाने पुढे जावे असे आवाहनही पित्रोदा यांनी केले.
‘सकारात्मक दृिष्टकोनाचा माणूस’अशा शब्दात मुकेश अंबानी यांनी पित्रोदा यांचा गौरव केला. आपण त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. अनेक अडचणींवर मात करून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. याला कारण त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असून तो सर्वाना प्रेरणादायक असल्याचेही अंबानी म्हणाले. या कार्यक्रमास प्रशासन, उद्योग क्षेत्रातली अनेक मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा