पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आदर्श ग्राम योजनेतून कोकणाच्या संगमेश्वर तालुक्यातील गोळवली या निसर्गरम्य गावाचा कायापालट घडविण्याकरिता केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी पुढाकार घेतला आहे. पण केवळ निसर्गरम्य गाव एवढीच या गावाची ओळख नाही. केंद्रातील सत्तेवरील भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा गोळवलकर गुरुजी यांचे हे मूळ गाव असल्याने, येत्या दोन वर्षांंत या गावाचा आगळ्या पद्धतीने कायापालट होणार आहे. या गावाच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या असून त्या प्रत्यक्षात आणून आदर्श गाव उभे करण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे पीयूष गोयल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
देशातील तीन ते पाच हजार वस्तीचे एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास घडवावा, अशी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या भाषणात लाल किल्ल्यावरून मांडली होती. ११ ऑक्टोबर २०१४ रोजी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीदिनी ‘सासंद आदर्श ग्राम योजना’ या नावाने ती जाहीर करण्यात आली.  ५४८ संसद सदस्यांनी देशातील असे एक गाव दत्तक घेऊन २०१६ पर्यंतच्या दोन वर्षांंत त्या गावाचा संपूर्ण विकास घडविला, तर देशातील सर्व खेडी विकसित होतील, अशी या योजनेची संकल्पना आहे. अशा गावात शिक्षणाच्या आधुनिक सुविधा, परिपूर्ण आरोग्यसेवा, स्वच्छता, यांबरोबरच, तेथील निसर्गसौंदर्य आणि स्थानिक वैशिष्टय़े जपणारा विकास घडवावा अशी मोदी यांची कल्पना आहे.
पियुष गोयल यांनी या योजनेसाठी गोळवलीची निवड केली. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावात सध्या गोळवलकर गुरुजींच्या स्मृत्यर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही सेवा प्रकल्प आणि गोशाळा चालविली जाते. निसर्गसौंदर्याने नटलेले आणि डोंगरउतारावरून वाहणाऱ्या नैसर्गिक झऱ्यांच्या पाण्यावर पोसलेले हे गाव आता सरकारी योजनेतून नवे रूप धारण करणार आहे. संघ ही भाजपची मातृसंस्था असल्यामुळे संघाशी संबंधित असलेल्या ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तींच्या गावाचा विकास करण्यावर भाजपचे खासदार भर देणार असून गोयल यांनी याच भावनेतून गोळवलीची निवड केल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
 पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित असलेल्या सर्व सुविधा या गावात आपण आणणार असून विकासाचे एक वेगळे ‘मॉडेल’ येथे निर्माण केले जाईल, असा गोयल यांचा विश्वास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारचेही सहकार्य
गोयल यांनी या गावाची निवड केल्याचे स्पष्ट होताच राज्य सरकारनेही गोळवलीच्या विकासासाठी गोयल यांना सहकार्य करण्याचे ठरवले आहे. स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोळवलीच्या विकासात जातीने लक्ष घातले असून या गावाच्या विकास योजनेच्या कार्यवाहीत राज्य सरकारच्या यंत्रणेकडून कोणतीही कसूर होऊ नये अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. दरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही या गावाला भेट दिल्याने, ग्रामस्थांच्या डोळ्यातील विकासाची स्वप्ने गडद झाली आहेत.