मुंबई: उत्तर मुंबईच्या लोकसेवकाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे.  विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्तर मुंबईला ‘उत्तम मुंबई’ बनविण्याचा आपला निर्धार आहे. त्यासाठी या मतदार संघातील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या माध्यमातून लोकांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी हक्काचे घर,  भव्य मल्टी स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे आश्वासन उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी मतदारांना दिले. काँग्रेसनेते राहुल गांधी वायनाडमधून हरणार असून त्यांनी  आपल्याविरोधातही निवडणूक लढविण्याची  हिंमत दाखवावी असे आव्हानही गोयल यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या गोयल यांनी या मतदार संघाच्या विकासाची आपली योजना मतदारांसमोर मांडली. यावेळी त्यांनी कांदा निर्यातीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संविधान बदलाच्या मुद्दय़ावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. मुंबईतील शिक्षण, व्यवसाय आणि भाजपच्या माध्यमातून आपण मुंबई जवळून पाहिली आणि अनुभवली आहे. वंदे भारत रेल्वे आणि मेट्रो रेल्वेने मुंबई आणि देशाचा रेल्वे प्रवास सुकर केला आहे. तसेच आपल्या रेल्वे मंत्रीपदाच्या कार्यकाळात १९ महिने शून्य मृत्यूसह सुरक्षित रेल्वे प्रवासाची नोंद झाली असून त्याचे  समधान आहे. विकसित भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा आपला निर्धार आहे. 

हेही वाचा >>>पत्रकार महिलेला धमकावल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

येथील लोकांच्या  सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यास आपले प्राधान्य असेल अशी माहिती त्यांनी दिली. उत्तर मुंबईतील जनतेचे चांगले आरोग्य हा चांगल्या पर्यावरणाशी निगडित विषय आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त उत्तर मुंबई हेच उत्तम मुंबईचे प्रतीक ठरणार असून उत्तर मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचेही गोयल यांनी सांगितले.

वायनाड लोकसभा मतदारसंघातून पराभूत  होण्याच्या धास्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता अन्य  मतदारसंघाचा शोध सुरू केला असून त्यांनी चार पाच ठिकाणी लढावे. आपल्या विरोधातही लढावे असे आव्हान त्यांनी दिले. तसेच आजवर काँग्रेसनेच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असून त्यांना निवडणुकीत हरवण्यासाठी काँग्रसनेच कारस्थाने केली. पण मोदींच्या हातातच बाबासाहेबांचे संविधान सुरक्षित असल्याचा दावाही गोयल यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Piyush goyal determination to make north mumbai great mumbai maharashtra day 2024 amy
First published on: 28-04-2024 at 03:34 IST