मुंबई : जिथे कचरा दिसेल, तिथली छायाचित्रे काढून महापालिकेला पाठवा. त्यावर कारवाई झाली नाही तर भाजपा कार्यालयात तक्रार करा, असे आवाहन उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी केले. तसेच परिसर स्वच्छतेसोबतच प्रशासनाने पुढील १०० दिवसांत १०० शौचालयांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी. तसेच रस्त्यांच्या कामांसंदर्भातील माहिती जनतेपुढे सादर करावी, असे निर्देशही त्यांनी पालिका प्रशासनाला दिले.
कांदिवलीचा समावेश असलेल्या ‘आर दक्षिण’ विभागातील चारकोप गाव येथे ‘खासदार स्वच्छता मोहीम’चे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. गोयल यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात झाली. त्यावेळी गोयल यांनी वरील आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, परिसर स्वच्छतेसाठी प्रशासन प्रयत्न करीत असते. पण, स्वच्छता ही केवळ यंत्रणेची जबाबदारी नसून शासन, प्रशासन आणि जनतेचे यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक आहे. स्वच्छ उत्तर मुंबईसाठी प्रत्येक घटकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही गोयल यांनी यावेळी केले.
स्थानिक आमदार योगेश सागर, उप आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त मनिष साळवे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. खासदार स्वच्छता मोहिमेअंतर्गत शुक्रवारी संपूर्ण उत्तर मुंबईत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
हेही वाचा…गोरेगाव, मालाडमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद
वेगवेगळ्या प्राधिकरणांकडून कामे सुरू असताना त्यांच्याकडून राडारोडा रस्त्यालागत टाकला जातो. तिथे गाळ तसाच सोडला जातो. तो त्वरित हटवण्यात यावा, अशा सूचना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेने दिलेल्या सूचनांनुसार ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करण्याची जबाबदारी नागरिकांनी पाळली पाहिजे. जिथे महापालिका अधिकारी लक्ष देत नाहीत तेथील तक्रारी १९१६ या महापालिकेच्या मदत क्रमांकावर कराव्यात, असे आवाहन गोयल यांनी केले.
हेही वाचा…पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या
कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
रस्त्यांच्या दर्जाबाबत अजिबात तडजोड चालणार नाही. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची नावे कायम स्वरुपी काळ्या यादीत टाका. जिथे खोदकामे करण्यात येईल तिथे काम सुरू करण्याची, तसेच काम संपण्याची तारीख दर्शवणारा फलक लागलाच पाहिजे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.