मुंबई : पु. ल. देशपांडे यांनी रसिक प्रेक्षकांना आपल्या कलाकृतीतून निखळ आनंदच दिला. पु. ल. म्हणजे महाराष्ट्राचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काढले.
मराठी कला-संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेचे साक्षीदार असलेले रवींद्र नाट्यमंदिर आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झाले. त्यावेळी ते बोलत होते. पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतीशी जोडले जाण्याचे भाग्य मुख्यमंत्री म्हणून यानिमित्ताने मला मिळाले, असेही यावेळी फडणवीस म्हणाले. नव्याने तयार करण्यात आलेल्या वास्तूचे कौतुक करत असतानाच त्यांनी गावागावांतील नाट्य मंदिराच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षण करण्यात आले असून त्याकरिता ६० ते ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून लवकरच प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री आशीष शेलार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, पु. ल. देशपांडे यांचे पुतणे जयंत देशपांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नव्या वास्तूच्या आवारातील कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रातील नामांकित चित्रकार, सुलेखनकार आणि शिल्पकारांच्या ५० कलाकृतींचे तळमजल्यावरील दालनात १५ मार्चपर्यंच विशेष प्रदर्शन भरणार आहे. त्याचेही उद्घाटन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तिसऱ्या मजल्यावरील मिनी थिएटरचेही लोकार्पणही यावेळी करण्यात आले. अत्युच्च दर्जाची ध्वनी यंत्रणा या थिएटरमध्ये बसवण्यात आलेली आहे. पु. ल. कट्टा असलेले अँफी थिएटरचेही लोकार्पण करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव…
नूतनीकरण केलेल्या वास्तूत येत्या २१ ते २४ एप्रिल या काळात आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव भरवण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी केली. दीड वर्षात अत्यंत कमी वेळात ही वास्तू तयार झाल्याबद्दल शेलार यांनी सर्व संबंधितांचे कौतुक केले. तसेच या वास्तूत सांस्कृतिक उन्नती करणारेच कार्यक्रम होतील अशी ग्वाही दिली.
पु. ल. यांचा पुतळा…
आधीच्या वास्तूत असलेल्या पु. लं.च्या पाठमोऱ्या पुतळ्याची जागा आता बदलण्यात आली असून हा पुतळा आता वास्तूलगत उभा केला आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारापाशी नाटकाची भव्य घंटा आणि वाढवलेला नारळ यांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.