मुंबई : ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ (बीपीटी)तर्फे भाऊचा धक्का ते मांडवा या जलमार्गावर प्रायोगिक वाहतुकीसाठी ‘रॉ-पेक्स’ या अजस्र जहाजाची खरेदी केली जाणार आहे. यासाठी ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’ (जेएनपीटी), ‘महाराष्ट्र सागरी महामंडळ’ (एमएमबी) आणि ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ’ (सिडको) प्रत्येकी १० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करतील. या सेवाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढे ती नवी मुंबई विमानतळाला जोडण्याचा बीपीटी प्रशासनाचा विचार आहे. या जहाजातून सुमारे ८० गाडय़ा आणि २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील.

रस्ते वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जल वाहतुकीला प्राधान्य देणारे प्रकल्प ‘बीपीटी’ने आखले आहेत. याअंतर्गत आता ‘रॉ-पेक्स’ जहाजाची खरेदी पोर्ट ट्रस्ट प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यापूर्वी ‘रॉ-पेक्स’च्या खरेदीसाठी नेमलेले तीन कंत्राटदार हे जहाज सेवेत आणण्यात यशस्वी झाले नाहीत. त्यातील एका कंत्राटदाराने ‘एमएमबी’विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने कंत्राटदारांकडून होणाऱ्या रॉ-पेक्सच्या खरेदीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे ‘बीपीटी’ने इतर तीन संस्थांच्या आर्थिक मदतीच्या बळावर या जहाजाची खरेदी करण्याचे नक्की केले आहे. भाऊचा धक्का ते मांडवा या जलमार्गावर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात येईल. ‘बीपीटी’ने दिलेल्या माहितीनुसार सध्या भाऊचा धक्का ते मांडवा जलमार्गावरील फेरी सेवेचा लाभ दरवर्षी १४ लाख प्रवासी घेतात. या  जलमार्गाची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने ‘रॉ-पेक्स’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. या जहाजात १० बस, ५० ते ६० गाडय़ा आणि २०० प्रवासी सामावून घेता येतील.

सध्याची योजना आणि विस्तार 

* ‘रॉ-पेक्स’ हे ४० कोटी रुपयांचे हे जहाज खरेदी करण्यासाठी जेएनपीटी, एमएमबी आणि सिडको प्रत्येकी १० कोटी रुपयांची मदत करणार असल्याची माहिती ‘बीपीटी’चे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली. भाऊचा धक्का ते मांडवा या सेवेच्या माध्यमातून मिळणारा नफा चारही संस्था वाटून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जहाजाच्या खरेदीसाठी येत्या काही दिवसांमध्ये निविदा काढण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.

* ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर चालविण्याचा निर्णय पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने घेतला आहे. या सेवेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात अशी आणखी काही जहाजे विकत घेऊन ही सेवा सिडकोकडून नेरूळ येथे बांधण्यात येणाऱ्या जेट्टीपर्यंत विस्तारित करण्याचा विचार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर या जेट्टीवर उतरून प्रवासी आणि वाहनचालकांना पुढील प्रवास करता येईल.

Story img Loader