शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर नितेश राणे यांना कोल्हापुरला नेण्यात आलं होतं. नितेश राणेंनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर रुग्णवाहिकेतून नितेश राणे यांना कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नितेश राणे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
“सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर मला एका प्रकरणात गोवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात मला पोलिसांचा आणि प्रशासनाचा जो अनुभव आला तो थक्क करणारा होता. कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात मला दाखल केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी मला सिटी अँजिओग्राफी (CT angiography) करण्याचा आग्रह केला. त्यावेळी माझे ब्लड प्रेशर लो होते ते मला कळत होते. तरीही डॉक्टरांनी सिटी एन्जो करायला सांगितली. तिथे सगळेच सरकारच्या बाजूचे नव्हते काही आमच्याही ओखळीचे होते. तिथल्या कर्मचाऱ्यांनी येऊन सांगितले की सिटी अँजिओग्राफी करु नका. कारण त्यानिमित्ताने इंक शरिरात टाकायला लागते. इंक टाकून तुम्हाला मारुन टाकण्याची योजना आहे. मला मारुन टाकण्याची योजना आहे असे तिथल्या कर्मचाऱ्याने सांगितले. त्यांनी यासाठी होकार देऊ नका असेही सांगितले,” असे नितेश राणे यांनी म्हटले.
“माझे ब्लडप्रेशर, शुगर लेव्हल लो दाखवत असतानाही रात्री २०० पोलीस मला घेऊन जाण्यासाठी पाठवण्यात आले. पोलिसांना रात्री अडीच वाजता येऊन माझी अवस्था खराब असल्याचे पाहिल्यानंतर तेव्हा ते बाहेर गेले. तरीही वारंवार दबाव येत होता आणि मुंबई कलानगरच्या परिसरातून फोन येत होते. अशा प्रकारचे व्यवहार त्यावेळी सुरु होते. विरोधी पक्षातल्या नेत्यांना जीवंतच ठेवायचे नाही असा प्रकार राज्यात सुरु आहे,” असे नितेश राणे म्हणाले.
“३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोप करणारी व्यक्ती सर्वत्र फिरत होती. ती व्यक्ती दुसऱ्याच दिवशी गावभर स्वतःचे सत्कार स्विकारत फिरत होती. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. त्यावेळी संबंधित व्यक्तींनी तो जबाब वाचला आणि तसे घडले नसल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींवर गुन्हा दाखल करु असे सांगितले,” असे नितेश राणेंनी म्हटले.
“दिशा सालियनची आत्महत्या असेल, तर मग सीसीटीव्ही का गायब केले. वॉचमन गायब, वहिची पाने गायब. रोहन रॉय गायब आहे. दिशाची आत्महत्या नाही हत्याच आहे. माझ्याकडे त्याबाबतचा पेन ड्राईव्ह आहे, तो मी न्यायालयात देणार आहे. माझ्याकडे पुरावा आहे. आम्ही सिद्ध करू शकतो की आठ तारखेच्या रात्री राज्यातला एक मंत्री त्या ठिकाणी होता,” असेही राणे म्हणाले.