मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आणि इतर प्रशासनाने केलेले नियोजन फारसे यशस्वी ठरल्याचे दिसत नाही. प्रवासी आणि अनुयायांना ये-जा करणाऱ्यासाठी अनेक पूल, प्रवेशद्वार बंद केल्याने दादर स्थानक परिसरात गर्दी झाली आहे. तसेच शहराच्या पूर्व- पश्चिम भागांत जा-ये करण्यासाठी अनुयायांना दादर स्थानकाला संपूर्ण वळसा घालून जावे लागत आहे.
मध्य व पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकातील पूर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा पूल व फलाट क्रमांक ६ वरील सर्व प्रवेशद्वारे ५ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून बंद करण्यात आली आहेत. हा पूल पूर्व-पश्चिम प्रवासातील सर्वात महत्त्वाचा पूल आहे. पूल बंद केल्याने प्रवाशांना आणि अनुयायांना परळ आणि माटुंगा दिशेकडील पूल खुले केले आहेत. मात्र प्रवाशांना, अनुयायांना तेथे जाणे अडचणीचे ठरत आहे. परिणामी, पोलीस आणि प्रवासी यांचे सध्या खटके उडताना, वादविवाद होत असताना दिसून येत आहे.