मुंबईच्या महापौरपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी इच्छुक नगरसेविकांनी पालिकेतील शिवसेनेची भोई खांद्यावर मिरविणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या दालनात खेटे घालायला सुरुवात केली आहे. पालिकेतील नेत्यांची मनधरणी, यापूर्वी उद्भवलेले वाद मिटविण्याचे प्रयत्न त्यापैकी काही जण करीत आहेत. सोडतीमध्ये मुंबईचे महापौरपद अनुसूचित जातीतील माहिलांसाठी आरक्षित झाल्याने आलेली संधी सोडायची नाही असा निर्धार करून तीन नगरसेविका आणि शिवसेनेत सक्रिय असलेले त्यांचे पतीराज मोर्चेबांधणी करू लागले आहेत.
मुंबईचे महापौरपद अनुसूचित जातीतील महिलांसाठी आरक्षित होताच शिवसेनेतील नगरसेविका यामिनी जाधव, स्नेहल आंबेकर आणि डॉ. भारती बावदाणे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित प्रभागाऐवजी खुल्या प्रभागातून निवडणूक लढल्यामुळे यामिनी जाधव यांना महापौर पदापासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे होती. मात्र अनुसूचित जातीची कोणतीही नगरसेविका महापौर पदासाठी पात्र असल्याचे पत्र पालिका दफ्तरी सापडले आणि यामिनी जाधव यांच्याही आशा पल्लवीत झाल्या. आता महापौर पदाच्या आसनात विराजमान होण्यासाठी या तिघींमध्ये चुरस सुरू झाली आहे.पालिका सभागृह आणि सदस्य असलेल्या समित्यांच्या बैठकीशिवाय पालिका मुख्यालयात कधीही न दिसणाऱ्या स्नेहल आंबेकर आणि डॉ. भारती बावदाणे यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. महापौर सुनील प्रभू आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांची भेट घेण्यासाठी स्नेहल आंबेकर पालिका मुख्यालयात येऊन गेल्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी डॉ. भारती बावदाणे यांनी यशोधर फणसे यांची भेट घेतली. याची माहिती मिळताच यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांनी थेट मुख्यालय गाठून यशोधर फणसे यांच्याशी चर्चा केली. हजरजबाबी आणि भाषण कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या यामिनी जाधव यांचे यशोधर फणसे यांच्याबरोबर अनेक वेळा खटके उडाले होते. पालिकेत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीतही या दोघांमध्ये खडाजंगी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा