|| शैलजा तिवले
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला
मुंबई : करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून या लाटेची तीव्रता कमी करण्यासह आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू नये यासाठी आत्तापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच पहिली आणि दुसरी लाट हाताळताना आढळेल्या त्रुटी, उणीवा भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करणेही आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
ब्रिटनपासून अनेक देशांमध्ये दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट आली आहे. त्यामुळे राज्यातही तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लाटेची तीव्रता ही नागरिकांची वर्तणूक आणि विषाणूचे उत्परिवर्तन या दोन्ही घटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे याचे आत्तापासून नियोजन करणे गरजेचे आहे. कृती दलाने याबाबत उपाययोजना आरोग्य विभागाला सुचवल्या आहेत, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.
मनुष्यबळाचे व्यवस्थापन हवे
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवला. जवळपास दीड वर्ष तेचतेच मनुष्यबळ कार्यरत असून ते आता थकून गेले आहे. तेव्हा मनुष्यबळ उभारण्यासाठी आत्तापासूनच वैद्यकक्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी अशा सर्व घटकांना करोनावरील पायाभूत उपचार सेवेचे प्रशिक्षण वेगाने देणे गरजेचे आहे. कन्स्ल्टंटसह आयुष डॉक्टरांना अतिदक्षता विभागाच्या व्यवस्थापनांचे प्रशिक्षण द्यायला हवे. जेणेकरून आवश्यकता भासल्यास आरोग्य सुविधांचा विस्तार जलदगतीने करणे शक्य होईल. जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी मुलभूत आरोग्य सुविधा आणि यंत्रणांचा विस्तार तातडीने करणे महत्त्वाचे असल्याचे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ.अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.
मे अखेरपर्यत दुसरी लाट ओसरण्याची शक्यता
मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु अजून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असते आणि त्याचा उच्चांकही बराच काळ राहतो. त्यामुळे राज्यातील संसर्गप्रसार कमी होण्यासाठी अजून आठवडाभराचा कालावधी लागेल. साधारण मे महिन्याअखेर ही दुसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे, असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.
औषधांसह सामुग्रीपुरवठा व्यवस्थापन
सध्या करोनासाठी विस्तारित केलेली रुग्णालये रुग्णसंख्या कमी झाली तरी सुरूच ठेवावीत. पहिल्या लाटेनंतर बंद केली तशी बंद करू नयेत. रुग्णालयातील यंत्रसामुग्रीची देखभाल योग्यरितीने या काळात केली जावी, जेणेकरून ती निकामी होणार नाहीत. तसेच या रुग्णालयांचा वापर लसीकरणासाठी करून जलदगतीने लसीकरण करावे. औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी संबंधित कंपन्यासोबत करार करावेत. जेणेकरून पुरवठा सुरळीत केला जाईल. तसेच ऑक्सिजनसह औषधांचा सुनियंत्रित पुरवठा आणि वितरण केले जाईल याची पद्धती निर्माण करणे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळेस सुचेल तसे मार्ग आखत उपाययोजना केल्या. परंतु तिसऱ्या लाटेच्या वेळेस असे घडू नये यासाठी साथीच्या आजारांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती(एसओपी) विकसित करून रुग्णांचे वर्गीकरण, संवाद इत्यादीबाबतच्या त्रुटी दूर करायल्या हव्यात, असे डॉ. सुपे यांनी सांगितले.
प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना
स्मार्ट टेस्टिंग म्हणजे एखाद्या भागात अधिक रुग्ण आढळले तर तो भाग प्रतिबंधित करून अधिकाधिक चाचण्या करणे, जेणेकरून रुग्णांचे निदान आणि उपचार वेळेत केले जातील आणि संसर्गप्रसार रोखला जाईल. रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींचा २४ तासांच्या आत शोध घेणे. लोकांची गर्दी होईल अशा घटनांना प्रतिबंध ठेवणे. निर्बंध शिथिल केले तरी करोना प्रतिबंधात्मक नियमांच्या पालनावर भर देणे या उपाययोजना करायलाच हव्यात, असे मत कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल डॉ. पंडित यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण तीन ते चार महिन्यांत पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु आता लशीची उपलब्धता हा प्रश्न असल्याने याबाबत अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. ४५ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण या दोन महिन्यांत व्हायला हवे, असेही पंडित यांनी सांगितले.
प्रगत तंत्रज्ञानाची गरज
आरोग्य विभागाने प्रगत तंत्रज्ञानावर गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ग्रामीण किंवा जिल्हा रुग्णालये तंत्रज्ञानाने मोठ्या रुग्णालयांशी जोडली तर प्रकृती गंभीर झाल्यास रुग्णांना दुसरीकडे नेण्याची धावपळ करावी लागणार नाही. गंभीर प्रकृतीच्या रुग्णाला काय उपचार द्यावेत यात ७० ते ८० टक्के मेंदूचे कौशल्य लागते. संगणकावरून रुग्णाची स्थिती समजून त्याबाबत मार्गदर्शन करता येते. केवळ २० ते ३० टक्के मनुष्य कौशल्य लागते. जे तेथील डॉक्टरांकडून उपलब्ध करता येऊ शकते, असे डॉ. पंडित यांनी सांगितले.