मुंबई : महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून कांदिवली आणि दहिसर परिसरात ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत सोमवारी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेत बकुळ, पेरू, ताम्हण, बहावा, करंज आदी विविध झाडे लावली. कांदिवली परिसरातही पाच हजार झाडांचे रोपण करण्यात आले आहे.
आईच्या नावाने प्रत्येकाने एक झाड लावावे, या हेतूने ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत संपूर्ण देशात वृक्षारोपण केले जात आहे. महापालिकेच्या उद्यान खात्यानेही या अभियानात सहभाग घेतला असून अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे. नुकतेच महापालिकेच्या उद्यान खात्याने कांदिवली – दहिसर परिसरात वृक्षारोपण केले. या उपक्रमात आर उत्तर विभागातील महानगरपालिका शाळेचे विद्यार्थी, विबग्योर हायस्कूल, रुस्तमजी इंटरनॅशनल, आर दक्षिण विभागातील स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
हेही वाचा – पीकविमा योजनेत अमूलाग्र बदल, कृषिमंत्र्यांकडून संकेत, विरोधकांची टीका
कांदिवली परिसरातही पाच हजार झाडांचे रोपण करण्यात आले. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आईच्या नावाचा फलक असलेल्या झाडासहीत सेल्फी घेऊन आनंद साजरा केला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला होता. शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेले आपल्या आईच्या नावाचे फलक वृक्षारोपण करताना प्रत्येक वृक्षाला लावण्यात आले. नुकतेच पालिकेच्या के पश्चिम विभागातही उद्यान खात्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करून बहावा (अमलताश) जातीच्या झाडांचे रोपण केले होते.
हेही वाचा – स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवा – आरोग्यमंत्री
उपआयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांनी शालेय विद्यार्थ्यांना ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेची विस्तृतपणे माहिती देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला ही संकल्पना आपल्या परिसरामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये रुजवण्याचे आवाहन केले. यावेळी सहायक आयुक्त नयनीश वेंगुर्लेकर, मनीष साळवे आदींसह स्वामी विवेकानंद शाळेचे विश्वस्त उपस्थित होते.