मुंबई : ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते किंवा नाही, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल. या समितीचा अहवाल येईपर्यंत ‘पीओपी’ गणेशमूर्तींचा वापर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे ‘पीओपी’ गणेशमूर्तींचा मुद्दा उपस्थित केला. या मूर्तींच्या वापरास बंदी घातल्यामुळे एकीकडे हजारो कामगार बेकार होणार आहेत, तर दुसरीकडे ‘पीओपी’ गणेश मूर्तींच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारची नेमकी भूमिका काय, अशी विचारणा दानवे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार प्रदूषणाविरोधात आहे. ‘पीओपी’तील प्रदूषण संपवता येईल का किंवा कमी करता येईल का, यातून काही मार्ग काढता येईल का, यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत न्यायालयाने आम्हाला मुदतवाढ द्यावी, यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

Story img Loader