मुंबई : माघी गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (पीओपी) मूर्तींना पूर्णत: बंदी असली तरी मुंबईत जागोजागी अद्यापही पीओपीच्या मूर्तींसाठी ऑगस्ट महिन्यात उभारलेले मंडप तसेच आहेत. या मंडपांमध्ये पीओपीच्या मूर्ती तयार करण्याचे कामही सुरू असून काही मंडपांमध्ये लाकडी वस्तूंची विक्रीची दुकाने थाटलेली आहेत तर काही ठिकाणी गाड्या धुण्याचे कामही चालते. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींची बंदी ही केवळ कागदावरच उरली असल्याचा आरोप मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांनी केला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर २०२० मध्ये बंदी घातली होती. मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. यंदा पालिका प्रशासनाने माघी गणेश जयंतीच्या मुहुर्तावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर पूर्णतः बंदी घालण्याचे ठरवले आहे. तसेच परिपत्रकही काढले होते. मात्र ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात जागोजागी पीओपीच्या मूर्तींचे मंडप दिसत असल्याचा आरोप मूर्तीकारांच्या संघटनेने केला आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाच्यावेळी पालिका प्रशासनातर्फे मूर्तीकारांनाही मंडप उभारण्यासाठी परवानगी दिली जाते. ही परवानगी नवरात्रोत्सवापर्यंत असते. मात्र नवरात्र संपून तीन चार महिने उलटून गेले तरी काही ठिकाणी पीओपीच्या मूर्तीकारांचे हे मंडप तसेच आहेत. अनेकांनी हे मंडप काढलेलेच नाहीत. याबाबत गणेश मूर्तीकला समिती या संघटनेने पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
हेही वाचा – मुंबई : किरकोळ वादातून बांबूने मारहाण करून खून, एक जखमी
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत राजे यांनी सांगितले की, कांदिवली पश्चिमेकडील चारकोप परिसरात पीओपीच्या मूर्तीचे अनेक मंडप अद्याप काढलेले नाहीत. या मंडपांमध्ये पीओपीच्या मूर्ती घडवण्याचे काम सुरू असते. अनेक मूर्ती या अशाच पदपथावर ठेवलेल्या असतात. काही मंडपांचा अनधिकृत वापर सुरू आहे. या मंडपांच्या लाकडी सामान किंवा अन्य वस्तू विकण्याची दुकाने उघडलेली आहेत.
भायखळा परिसरातही ना म जोशी मार्गावर बकरीअड्डा परिसरातही पीओपीच्या मूर्तींचे असेच मंडप उभारले असल्याची तक्रार राजे यांनी केली आहे. शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकारांनी मंडपासाठी परवानगी मागितली तर आता परवानगी बाबतचा कोणताही नवीन निर्णय झाला नसल्याचे उत्तर पालिका प्रशासनाकडून दिले जाते. मात्र पीओपीच्या मूर्तीकारांनी अनधिकृतपणे मंडपे उभारलेली आहेत, तसेच आधी उभारलेली मंडपेच अनधिकृतपणे वापरली जात असल्याचा आरोप राजे यांनी केला आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासंदर्भातील बाबींचा निर्णय हा परिमंडळ दोन चे उपायुक्त घेत असतात. तर मंडपांवर कारवाईचा विषय हा विभाग कार्यालयांच्या हद्दीत येतो. त्यामुळे या दोन विभागांच्या अधिकारक्षेत्रातील वादामुळे पीओपीच्या मूर्तीकारांचे मात्र फावले आहे.