गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिकवरील वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रेल्वे स्टॉल्सवर प्लास्टिकमधून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ आणि वस्तूंवरही लागू करण्याचा निर्णय पश्चिम व मध्य रेल्वेने घेतला असून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. याबाबतच्या सूचना रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल्सना देण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. नियम मोडताना एखादा स्टॉलधारक आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या सूचना जरी देण्यात आल्या असल्या तरी स्टॉलवर काही कंपन्यांचे विकल्या जाणाऱ्या पॅकिंग खाद्यपदार्थाचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. यामध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनातच दुमत होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्लास्टिकमुळे पावसाळ्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेला मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. रुळावर साचत असलेल्या पाण्याला प्रमुख कारण हे प्लास्टिकच असल्याचे रेल्वे प्रशासन सांगते. प्लास्टिकमुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळे पाणी साचते. हेच कारण पुढे करत मे २०१२ मध्ये मध्य रेल्वेने प्लास्टिकमधून विकल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या २५ खाद्यपदार्थावरही बंदी आणली होती. मात्र स्टॉलधारकांचा आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध पाहता यासंदर्भात न्यायालयात असलेली याचिका २०१४ साली निकालात काढण्यात आली आणि बंदी घालण्यास नकार दिला. यानंतर आता पुन्हा एकदा राज्य सरकारने दिलेल्या सूचनानंतर रेल्वेत प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून स्टॉलधारकांना काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. स्टॉलवर काही खाद्यपदार्थ किंवा पेय हे प्लास्टिकमधूनही दिले जातात. यामध्ये प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक पिशवी इत्यादींचाही समावेश आहे.

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची अजब माहिती

मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी रेल्वेते प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली असली तरी याबाबत आपणाला सविस्तर माहिती नसल्याचे सांगितले. रेल्वेत प्लास्टिकमधून कोणत्या खाद्यपदार्थावर बंदी आहे हे आमचे संबंधित विभागच सांगू शकते किंवा मुख्य जनसंपर्क विभागाशी संपर्क साधल्यास ते सांगू शकतील, अशी अजब माहिती दिली. मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र राज्य सरकारच्या सूचनांनुसार रेल्वे स्टॉल्सना प्लास्टिकमधून खाद्यपदार्थाच्या विक्रीसाठी बंदी लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. काही कंपन्यांचे प्लास्टिकमधून पॅकिंग असलेल्या खाद्यपदार्थावर विक्री होत असून त्यावरही बंदी येऊ शकते का याची माहिती घेत असल्याचे स्पष्ट केले.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी रेल्वेतही प्लास्टिक बंदी लागू करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे विविध खाद्यपदार्थ किंवा पेय प्लास्टिकमधून मिळणार नाहीत. मात्र विविध कंपन्यांच्या प्लास्टिकमधून विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावर अद्याप बंदी नसल्याचे स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plastic ban in maharashtra
Show comments