मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे या विभागांना जोडलेल्या दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांकावरून प्रवाशांचा गोंधळ उडत होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी शनिवारपासून मध्य रेल्वेवरील १ ते ८ फलाटांचे क्रमांक बदलून अनुक्रमे ८ ते १४ करण्यात आले आहेत. या बदलांबाबतची माहिती लोकल, रेल्वे स्थानकात वारंवार उद्घोषणा करून प्रवाशांना देण्यात येणार आहे. मात्र, नवीन बदलामुळे प्रवाशांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. दरम्याऩ पश्चिम रेल्वेचे फलाट क्रमांक कायम ठेवण्यात आले आहेत़
गणपती विशेष रेल्वेगाडय़ा, दिवाळी व इतर सणांनिमित्ताने सोडण्यात येणाऱ्या विशेष गाडय़ा आणि ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन झाल्यानंतर, फलाटांचे क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, ९ डिसेंबरपासून फलाटांचे नवीन क्रमांक दिसणार आहेत.
यात्री, एम-इंडिकेटर यासारख्या अॅपवरून प्रवाशांना दादर स्थानकाच्या फलाटांचे क्रमांक बदलण्याची माहिती देण्यात येत आहे. यासह उपनगरीय लोकल प्रवाशांच्या माहितीसाठी लोकल, रेल्वे स्थानकात वारंवार माहिती देण्यात येणार आहे. फलाटाचे क्रमांक बदलण्याचे काम शुक्रवारी रात्रीपासून सुरू करण्यात येणार असून, सकाळपासून नवीन फलाट क्रमांकाचे सूचना फलक स्थानकात दिसतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>> मुंबई : व्यवसायात गुंतवणूकीच्या नावाखाली दोन कोटींची फसवणूक
महत्त्व का?
पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील दादर स्थानक हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातून दररोज सुमारे १,०५० रेल्वेगाडय़ा धावत असून दररोज सरासरी १.७४ लाख प्रवासी आणि मध्य रेल्वेच्या या स्थानकातून दररोज सुमारे ९०० रेल्वेगाडय़ा धावतात़ दररोज सरासरी २.६० लाख जण प्रवास करतात.
गोंधळ का?
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात एकूण १४ फलाट आहेत. त्यात पश्चिम रेल्वेअंतर्गत सात आणि मध्य रेल्वेच्या अंतर्गत सात आहेत. मात्र, लांब पल्यांच्या रेल्वेगाडीसह लोकल प्रवाशांचा समान फलाट क्रमांकामुळे गोंधळ उडत होता.
मध्य रेल्वेकडून क्रमांकांतील बदल
मध्य रेल्वे : जुना क्रमांक नवीन क्रमांक
फलाट १ – ८
फलाट २ – कायमस्वरूपी बंद
फलाट ३ – ९
फलाट ४ – १०
फलाट ५ – ११
फलाट ६ – १२
फलाट ७ – १३
फलाट ८ – १४
(दादर टर्मिनस)