सध्याचे संगीत माझ्या आकलनापलिकडचे आहे. ज्या प्रकारची गाणी येत आहेत ती मानवणारी नसल्याने मी पाश्र्वगायन थांबविले आहे, असे मनोगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले. लतादीदींच्या एल एम म्युझिक कंपनीचा रविवारी म्हणजे आज मुंबईत शुभारंभ होत आहे, त्या पाश्र्वभूमीवर संगीतातील बदलत्या प्रवाहांवर त्या भडभडून बोलल्या.
चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात मदन मोहन, सलील चौधरी, जयदेव, सचिन देव बर्मन अशा अनेक संगीतकारांनी अजरामर गाणी दिली. ते संगीतकार गेले आणि त्यांच्यासोबत त्यांचे जादुई संगीतही गेले असे वाटते. मराठीतही हृदयनाथ, सुधीर फडके, श्रीनिवास खळे आदी संगीतकारांनी फार मोठे काम करून ठेवले आहे. हिंदी-मराठीतील हे संगीतकार परिश्रमपूर्वक कल्पक संगीत रचना करत व आमच्याकडून उत्तम गाणी घेऊन घेत असत. त्यामुळेच तेव्हाच्या गायकांना आपापल्या आवाजावरून ओळखले जायचे. सध्याच्या गायकांच्या वाटय़ाला हे भाग्य नाही, त्यांना स्वत:ची ओळख नाही. आजकालचे गाणे तांत्रिकदृष्टय़ा खूप पुढे गेले आहे मात्र दर्जाच्या बाबतीत आनंदीआनंद आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तरुण पिढीतही काही गुणी कलाकार असून त्यांना संधी मिळावी यासाठी आमची म्युझिक कंपनी प्रयत्नशील असेल. अशा कलाकारांना निवडून त्यांचे उत्तमोत्तम अल्बम श्रोत्यांसमोर आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. भक्तीगीते, शास्त्रीय, वाद्यसंगीत, गझल आदी अनेक प्रकारचे हे अल्बम असतील. सध्या कानावर पडणाऱ्या संगीतापेक्षा काहीतरी वेगळे व चांगले देण्याकडे आमचा कटाक्ष असेल, असे त्या म्हणाल्या.  संगीताचे सुवर्णयुग पुन्हा अवतरेल की नाही हे सांगणे कठीण आहे. मात्र तसे संगीतकार पुन्हा होणे दुरापास्त आहे. मी खूप म्हणजे तब्बल ७० वर्षे गायले त्याबद्दल माझ्या मनात कृतार्थतेची व समाधानाची भावना आहे, असे लतादीदी म्हणाल्या.
पाच बोटे अमृताची..
‘पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात’ असे सार्थ वर्णन जनकवी पी. सावळाराम यांनी ज्या मंगेशकर भावंडांचे केले त्या भावंडांचा एकत्रित कलाविष्कार या निमित्ताने रसिकांच्या भेटीला येत आहे. एल एम म्युझिकच्या आज प्रकाशित होणाऱ्या सहा अल्बममध्ये लता, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ या सर्व भावंडांचा सांगितिक सहभाग आहे. ‘रंग स्वरांचे, स्वामी समर्थ, तन खोया मन पाया, हर हर महादेव, सिद्धार्थ आणि सचिन मी होणार’ या सहा अल्बममध्ये लता, आशा, उषा यांनी पाश्र्वगायन केले आहे तर चार अल्बमना मीना खडीकर यांनी संगीत दिले आहे. हृदयनाथ मंगेशकर हे या कंपनीचे सल्लागार असल्याने या अल्बमच्या निर्मितीत त्यांचेही योगदान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा