मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विंडबनात्मक गीतामुळे वादात सापडलेल्या हास्य कलाकार कुणाल कामरासारख्या कलाकारांना संरक्षण देण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तसेच, राजकारणावर उपहासात्मक आणि मिश्किलपणे टीका करणाऱ्या हास्य कलाकारांवर मनमानी पद्धतीने दाखल होणारे गुन्हे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे आदेश देण्याची मागणी देखील विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने याचिकेतून केली आहे.
हास्य कलाकार कामराविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विधि शाखेच्या दुसऱ्या वर्षाच्या शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने ही जनहित याचिका केली आहे. कामरा याने केलेली टिपण्णी संविधानाच्या कलम १९ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्रानुसार संरक्षित जाहीर करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. कामराचे वक्तव्य उपहासात्मक आणि मिश्किल राजकीय टीका या दोन्हींच्या कक्षेत येते आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे संरक्षित असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये राजकीय विनोद आणि उपहासात्मक टीकेसारख्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा दावा देखील याचिकाकर्त्याने केला आहे.
दोहोंमध्ये फरक करणे गरेजेचे
हास्य कलाकारांकडून उपहासात्मक पद्धतीने केलेली राजकीय टीका आणि हिंसाचाराला प्रवृत्त करणारी भाषणे यांच्यात फरक अधोरेखीत करण्यासाठी व देशातील लोकशाहीचे स्वातंत्र्य अबाधित राहील यासाठी कायदेशीर चौकट आखणे आवश्यक आहे. त्याचाच भाग म्हणून हास्य कलाकारांच्या वक्तव्यावर मनमानी पद्धतीने दाखल होणारे गुन्हे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची गरज असून तसे आदेश देण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. तोपर्यंत कामरा याच्या चित्रफितींना प्रतिसाद देणाऱ्यांनाही संरक्षण देण्याची मागणी याचिकेत केली गेली आहे.
तोडफोडीच्या घटनेची वैधता तपासा
कामरा याची चित्रफित प्रसारित झाल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतींची कायदेशीर आणि घटनात्मक वैधता तपासण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. कामरा याचे वक्तव्य उपहासात्मक आणि मिश्किल राजकीय टीका म्हणण्यास पात्र आहे का ? आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारांतर्गत संरक्षित आहे का ? किंवा ते भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३५३ अंतर्गत गुन्हा आहे का ? राजकीय टीका-टिपण्णीवर फौजदारी कायदा लागू होऊ शकतो का ? कामरा याचा कार्यक्रम पार पडला त्या स्टुडिओवर पाडकामाची कारवाई करण्यात आली. परंतु, अन्यत्र अनधिकृत बांधकामे तशीच आहेत. हे घटनेच्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन नाही का ? कामरा याच्या चित्रफितीनंतर त्याला लक्ष्य करताना कथित द्वेषपूर्ण भाषण करणारे भाजप आमदार नितेश राणे आणि उजव्या विचारसरणीचे नेते संभाजी भिडे यांच्यावर कारवाई का झाली नाही ? हा अधिकाराचा गैरवापर नाही का ? असे प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.