पश्चिम रेल्वेवरील सात वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या वातानुकूलित लोकलमध्ये शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे प्रवासादरम्यान उन्हाच्या झळा बसू नये म्हणून प्रवाशांनी गारेगार प्रवासाठी अधिकचे पैसे मोजून वातानुकूलित लोकलचे तिकीट काढले. मात्र, अचानकपणे वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाल्याने गारेगार प्रवासाऐवजी उन्हाच्या काहिलीने हैराण होण्याची वेळ प्रवाशांवर ओढवली. वातानुकूलित लोकलच्या एका रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे तिच्या विरार – चर्चगेट अप आणि डाऊन अशा सात फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढली असून रेल्वे प्रवासी वातानुकूलित लोकलला प्राधान्य देऊ लागले आहेत. मात्र, वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड होऊ लागल्यामुळे प्रवासी हैराण होत आहेत. मध्य रेल्वेवरील कळवा-मुंब्रादरम्यान गुरुवारी वातानुकूलित लोकल अचानकपणे थांबली. या लोकलचे दरवाजे उघडत नव्हते. तसेच शुक्रवारी सकाळी ७.१५ च्या विरार – चर्चगेट लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ही लोकल विनावातानुकूलित लोकल म्हणून चालवण्यात आली. परिणामी, लोकलमध्ये ना एसी, विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी ना तिकीट तपासनीस (टीसी), ना कॉल पीकअप सुविधा. मात्र पश्चिम रेल्वेने प्रवाशांकडून वातानुकूलित लोकलचे जास्तीचे भाडे घेतले, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>“संजय हा शब्दही शिवीसारखा वाटतो”; आशिष शेलारांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले, “मी…”
पश्चिम रेल्वेवर सकाळपासून वातानुकूलित लोकलला विनावातानुकूलित लोकलमध्ये रूपांतरित करण्यात आले होते. या लोकलचे दरवाजे खुले ठेवून फेऱ्या चालवण्यात आल्या. पश्चिम रेल्वेच्या गलथान कारभाराची झळ दुपारच्या वेळी अधिक बसू लागली. दुपारच्या उन्हात गारेगार प्रवास होण्यासाठी प्रवासी वातानुकूलित लोकलचे तिकीट काढून या लोकलमध्ये बसत होते. मात्र, लोकलमधील वातानुकूलित यंत्रणाच बंद झाल्याने प्रवाशांना उन्हाचा दाह सोसावा लागला.
या बिघाडामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे वसई, भाईंदर, मीरा रोड येथे वातानुकूलित लोकल वारंवार थांबवली जात होती. परिणामी, इतर लोकलचे वेळापत्रक कोलमडले. विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल करावा लागला. तसेच पश्चिम रेल्वच्या सात वातानुकूलित लोकल रद्द केल्या आहेत.
हेही वाचा >>>“भाजपाने काही पोपट पाळून ठेवले आहेत, त्यांना…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला!
या वातानुकूलित लोकल झाल्या विनावातानुकूलित
सकाळी ७.१५ ची विरार – चर्चगेट लोकल
सकाळी ८.५३ ची चर्चगेट – विरार लोकल
सकाळी १०.२० ची विरार – चर्चगेट लोकल
सकाळी ११.४८ ची चर्चगेट – विरार लोकल
दुपारी १.१८ ची विरार – चर्चगेट लोकल
दुपारी २.५३ ची चर्चगेट – विरार लोकल
दुपारी ४.२० ची विरार – चर्चगेट लोकल
वातानुकूलित लोकलमधून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असून या प्रवाशांना पकडण्यासाठी तिकीट तपासनीस नसतो. त्यामुळे अधिकृत प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची वेळ येते.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना नुकसानभरपाई द्यावी
तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम सेवा देण्याची जबाबदारी पश्चिम रेल्वे प्रशासनाचे आहे. मात्र, प्रशासन त्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसानभरपाई द्यावी. तसेच, एका दिवसाचे तिकिटाचे पैसे परत करावे. निष्काळजीपणाने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. – सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद