मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने वाळकेश्वर येथील प्राचीन बाणगंगा परिक्षेत्र ‘बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर आणि कल्चरल प्रॉमिनेड’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे ‘बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर आणि कल्चरल प्रॉमिनेड’साठी आवश्यक असलेले दोन भूखंड या कामाऐवजी विकासकाच्या घशात घालून पैसे कमविण्याचा घाट घालण्यात आला आहे.
गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टच्या सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये याबाबतचा ठराव मांडून मंजुरी घेण्याचे प्रयत्न आहेत. त्याच वेळी हे दोन भूखंड विकासकाला देऊ नयेत यासाठी काही संस्था आणि नामवंत मंडळी एकवटली असून या मुद्द्यावरून विश्वस्तांमध्येही मतप्रवाह आहेत.
बाणगंगेचे महत्त्व
दक्षिण मुंबईमधील वाळकेश्वर परिसरातील बाणगंगेला ऐतिहासिक महत्त्व आहे. बाणगंगा तलाव पुरातन वारसा वास्तू श्रेणी क्रमांक १ मध्ये मोडतो. येथील वालुकेश्वर महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर बाणगंगा परिसरात २२ मंदिरे असून त्यापैकी १३ मंदिरे पुरातत्त्व खात्याच्या सूचीमध्ये समाविष्ट आहेत. या परिसरात दशनामी आखाडा आणि नाथ संप्रदायातील ६० ते ६५ समाधी आहेत.
स्थळ पाहणी
बाणगंगा परिक्षेत्र ‘बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर आणि कल्चरल प्रॉमिनेड’ म्हणून आरक्षित करण्यासाठी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नगर विकास विभागात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्य सरकार, तसेच मुंबई महापालिकेतील संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टतर्फे या प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर स्थळपाहणी करून सीमा निश्चित करण्याचे आदेश नगर विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव (नवि-१) यांनी दिले. महापालिकेत ७ जून २०२५ रोजी आयोजित बैठकीनंतर संयुक्तरीत्या स्थळपाहणी करण्यात आली.
अचानक माघार
स्थळ पाहणीनंतर अचानक चक्रे फिरली. गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टने ज्ञातीबांधवांची विशेष सर्वसाधारण सभा जाहीर केली. ट्रस्टच्या वालुकेश्वर मंदिराच्या मागे दोन भूखंड कातळ स्वरूपात असून एक भूखंड ४००.३० चौरस मीटर आणि दुसरा भूखंड १६३८.८२ चौरस मीटर क्षेत्रफळाचा आहे. हे भूखंड विकसित करण्याचा प्रस्ताव एका विकासकाने सादर केला आहे. हे दोन्ही भूखंड अतिक्रमित असून या भूखंडांचा विकास केल्यास बाजारभावानुसार किती परतावा मिळेल याचा अभ्यास करण्याचे काम एका वास्तुरचनाकारास देण्यात आले आहे. हे भूखंड कॉरिडॉरसाठी हवे आहेत. या भूखंडांचा विकास करण्यास मान्यता घेण्यासाठी ३१ मार्च २०२५ च्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. दरम्यान, गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टचे मानद सचिव शशांक गुळगुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.
बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉरमध्ये काय?
बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर प्रकल्पामध्ये वाळकेश्वर मंदिराची पुरातन पद्धतीने बांधणी करण्यात येणार आहे. या परिसरात प्रशस्त मंदिर संकुल आकारास येणार आहे. तसेच वेद पाठशाळा, गोशाळा, वाहनतळ, सागरी किनारा मार्ग आदींचा समावेश असणार आहे.
वाळकेश्वरच्या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे येथे ‘बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर’च व्हायला हवा. येथे विकास प्रकल्प राबवून टोलेजंग इमारती बांधणे अयोग्य ठरेल. – प्रवीण कानविंदे, अध्यक्ष, गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट