मधु कांबळे
२०२२ पर्यंत १९ लाख घरांचे उद्दिष्ट; ७६ हजार घरांचे बांधकाम सुरू
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने तीन वर्षांपूर्वी गाजावाजा करून सुरू केलेल्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत फक्त ७६ हजार घरांची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे २०२२ पर्यंत १९ लाख ४० हजार घरांचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.‘सर्वासाठी घर’ अशी घोषणा करीत देशात सर्व राज्यात पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे.
राज्यात जून २०१५ मध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत २०२२ पर्यंत १९ लाख ४० हजार घरे बांधणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यातील ३८३ शहरांमध्ये ही योजना राबवली जात आहे. योजनेत वेळोवेळी बदल करून, आता खासगी विकासक आणि जमीनमालक यांना सहभागी करून घेऊन तसेच त्यांना एफएसआय व इतर सवलती देऊन या योजनेला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारने सुमारे साडेसहा लाख घरे बांधण्याचे प्रस्ताव मंजूर केले आहेत, अशी माहिती मेहता यांनी दिली. पंतप्रधान आवास योजनेला गती देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यात म्हाडा, एसआरए, सिडको, नागपूर सुधार न्यास या संस्थांना सहभागी करून घेतले जाणार आहे. या संस्थांच्या वतीने गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतले जातील. त्यात पंतप्रधान आवास योजनेसाठीही घरे बांधून घेतली जाणार आहेत. राज्य सरकारने अलीकडेच १ जानेवारी २००० ते २०११ र्पयच्या अनधिकृत झोपडपट्टय़ांनाही सशुल्क घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. ही घरे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्याचा प्रस्ताव आहे. सशुल्क असले तरी, मुंबईसारख्या महानगरात ३०० चौरस फुटांचे घर झोपडपट्टीधारकांना आठ लाखांत मिळणार आहे. त्यातही निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे, असे मेहता यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आता ३० टक्के आर्थिक दुर्बलांसाठी, ३० टक्के अल्प उत्पन्न गटासाठी आणि ४० टक्के मध्यम उत्पन्न गटासाठी घरे बांधली जाणार आहेत. या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या सर्व सामान्यांसाठीही घरे बांधली जातील आणि ती परवडणारी घरे असतील, असे त्यांचे म्हणणे आहे. एका प्रकल्पात किमान पाच हजार घरे बांधण्याचे बंधन राहणार आहे. सध्या ७६ हजार घरांचे बांधकाम सुरू आहे, अशी माहिती मेहता यांनीच दिली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांतील या योजनेची वाटचाल पाहता, पुढील तीन वर्षांत १९ लाख ४० हजार घरांचे उद्दिष्ट पूर्ण होईल का हा प्रश्न आहे. उद्दिष्टाप्रमाणे घरबांधणीचे नियोजन केले आहे.
उद्दिष्टाप्रमाणे घरबांधणीचे नियोजन केले आहे. ठरलेल्या कालावधीतच हे उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत
-प्रकाश मेहता, गृहनिर्माणमंत्री