मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता असताना महिनाभरात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येत आहेत. आज, शनिवारी मुंबई, ठाणे आणि विदर्भातील वाशीम येथे मिळून तब्बल ५६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन किंवा उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
शनिवारी संध्याकाळी मुंबई आणि ठाण्यातील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत ३२ हजार ८०० कोटींच्या प्रकल्पांचे अथवा उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे ते बीकेसी या १२.५ किमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण बीकेसी मेट्रो स्थानकात पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यानंतर ठाण्या शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पासह छेडा नगर-ठाणे पूर्वमूक्त मार्ग (विस्तारीत) प्रकल्पाचे भूमिपूजनही होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी मुंबई महानगर प्रदेशातील विकास कामांच्या लोकार्पणाचा, भूमिपूजनाचा धडाका लावत मतदारांना आकर्षित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. हा ३० ऑगस्ट आणि २० सप्टेंबरनंतर मोदी यांचा साधारण महिन्याभरातील तिसरा दौरा आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात पुण्यातही त्यांचा कार्यक्रम होणार होता. मात्र अतिवृष्टी आणि सभास्थळी झालेल्या चिखलामुळे तो दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर पुण्यातील विविध प्रकल्पांचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा >>> पंतप्रधानांच्या रेवडी संस्कृतीवर शरद पवारांची टीका
मुंबईत दाखल होण्यापूर्वी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता. मानोरा) येथे कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’च्या १८ व्या हप्त्याचे वितरण आणि पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत सुमारे १९२० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवातही यावेळी केली जाणार आहे. बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
भुयारी मेट्रोतून प्रवास
‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी या १२.५ किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते बीकेसी ते सांताक्रुझ स्थानकांदरम्यान शहरातील पहिल्या भुयारी मेट्रोतून प्रवासही करणार आहेत. तत्पूर्वी ठाण्यातील कार्यक्रमात शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पासह छेडा नगर-ठाणे पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरण कामाचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे.